‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जनसागराच्या चरणी अर्पण

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या भावना

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जनसागराच्या चरणी अर्पण

प्रत्येक पुरस्कार हा मोठाच असतो. केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. त्यामुळेच हा पुरस्कार आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कार प्राप्त केल्यानंतर भावना व्यक्त केल्या. २५ लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही रक्कम आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याचेही धर्माधिकारी यांनी जाहीर केले.

खारघर येथे गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार टळटळीत उन्हातही उपस्थित असलेल्या अफाट जनसागराच्या साक्षीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकाच घरात देणं अशी घटना दुर्मिळ आहे. शासनाचे त्याबद्दल आभार.

मी खेडेगावातून माझ्या कार्याला सुरुवात केली. लोक शहरात जा असे म्हणत असत. पण खेडेगावात अंधश्रद्धा होती, लोकांना उत्तम वळण लावणे आवश्यक होते. सुविचारांची पेरणी व्हायला हवी. आम्ही प्रसिद्धीला महत्त्व देत नाही. त्यापासून आम्ही लांब आहोत. प्रसिद्धी करून काहीही प्राप्त होत नाही. जाहिरात त्याला करावी लागते ज्याला आपले उत्पादन विकायचे असते. आम्हाला त्याची गरद नाही. मानवताधर्म सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. नानासाहेब हे कार्य ८७ वर्षापर्यंत करत होते. जेवढे आयुष्य आहे तोपर्यंत मी काम करत राहीन. माझ्यानंतर उत्तराधिकारी सचिनदादा धर्माधिकारी हे काम पुढे नेणारा आहेत.

आप्पासाहेब म्हणाले की, आज समाजाचे ऋण आपल्यावर आहे, देशाचे ऋण आहे. आईवडिलांचे ऋण ते फेडण्यासाठी काय सेवा केली हे महत्त्वाचे आहे. देशसेवा करण्यासाठी काय करावे लागते. हेच आम्ही सांगत असतो. प्रत्येकाने ती केली पाहिजे.

समाजसेवा ही श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब प्रतिष्ठान आपण उभे केले. प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण हे समाजकार्य केले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपण समाजसेवा करत आहोत. प्रदूषण कमी व्हावे, चांगली हवा खेळती राहावी म्हणून आपले प्रयत्न आहेत. वृक्षरोपण हे लहान मुलाची निगा राखतो त्याप्रमाणेच असते. जसे मूल एकदा स्वतःच्या पायावर उभे राहिले की, त्याकडे तेवढे लक्ष देण्याची गरज नसते. तसेच वृक्षाचेही असते. स्वतंत्रपण तो वृक्ष उभा राहिला की मग पाहावे लागत नाही.

प्रत्येकाने सुदृढ आयुष्य जगावं यासाठी आपण आरोग्य शिबिरे घेतो. रक्तदान शिबिरांचे आयोजन करतो. थेलेसेमियासारख्या रोगासाठी रक्ताची गरज असते. त्यासाठी रक्तदान केले पाहिजे. तीदेखील एक समाजसेवा. श्रवणयंत्रांचे वाटप आपण करतो. थोडंफार ऐकायला येतं त्यासाठी ही यंत्रणा आपण उपलब्ध करून देतो.

आपण पाणपोया उभ्या केल्या आहेत. प्रतिष्ठानच्या फंडातून आपण हे काम करतो. बसथांबे बांधतो आहोत. बंधारे बांधून पाणी जिरविण्यासाठी आपण प्रयत्न करतो. खतनिर्मिती निर्माल्यापासून करतो. बोरिंगला पाणी मिळू लागले. पोलिस खात्याला आम्ही मदत करतो. आजच्या कार्यक्रमालाही पोलिसांनी अथक काम केले आहे. आपण त्यांचे उपकार मानले पाहिजेत.

हे ही वाचा:

दुहेरी हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू

नंदिनी गुप्ता ठरली ‘मिस इंडिया’

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या, देशभरात खळबळ, १७ पोलिस निलंबित

त्याग, सेवा, समर्पणामुळे मिळतो असा सन्मान

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, दिल्लीहून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी मला येथे उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतो. मी या मंचावरून सांगू शकतो की, सार्वजनिक क्षेत्रात समाजसेवेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीच्या सन्मानासाठी आलेली ही लाखो मंडळी मी जीवनात कधी पाहिलेली नाहीत. इतक्या मोठ्या संख्येने बसलेली ही सगळी मंडळी दाखवतात की, आपल्या मनात आप्पासाहेबांप्रती मानसन्मान आणि भक्तिभाव आहे. या प्रकारचा सन्मान त्याग, समर्पण आणि सेवामुळे मिळतो. जो आप्पासाहेबांमध्ये दिसतो आहे. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, भरोसा दिसतो. हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे.

गर्दीचे अनुसरण करू नका असे म्हणतात, असे करा की गर्दीने आपले अनुसरण केले पाहिजे. लाखो लोक आज आपल्या विचारांवर चालत आहेत. मी लहानपणापासून राजकारणात आहे. इतिहासाचा विद्यार्थी आहे. इतिहास वाचला आहे. लक्ष्मीची कृपा एका परिवारावर पिढ्यानपिढ्या असतात. अनेक वीर एका परिवारात होते. सरस्वतीची कृपा पिढ्यानपिढ्या असते. पण समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्या राहणे हे माझ्या जीवनात प्रथम पाहिले. नानासाहेब, आप्पासाहेब आणि सचिनभाऊ ही परंपरा जोपासत आहे. मी मनापासून सांगतो. की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे तर सन्मान देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचे कामही एकनाथजी आणि देवेदंरजी यांनी दिले आहे. महाराष्ट्र शासनासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचेही कौतुक करा, असेही अमित शहा म्हणाले.

 

आपल्या कर्तृत्वाने आपण देशाचे दिशादर्शन केले आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, जलसिंचन, महिला सशक्तीकरण, नशामुक्त समाज, अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रात आपण अनेक आदर्श निर्माण केले.

Exit mobile version