शहरातील मोक्याच्या जागा या विकासकांच्या नजरेत असतात. त्यामुळेच अशा जागा खाली करून त्याजागी आलिशान इमारती आणि मोठाले प्रकल्प उभे राहतात. नवी मुंबईची कृषी बाजार समिती असेच एक मोक्याचे ठिकाण सध्या दुसऱ्या जागेवर हलणार आहे अशी चर्चा सुरु आहे.
नवी मुंबईतील ही बाजारपेठ आता न्हावा शेवा येथे हलवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या ७० हेक्टरवर येथे पाच बाजार भरतात. त्यामुळे त्या अनुषंगाने व्यापारी वर्गाचे येथे दुकाने आहेत. त्यामुळेच आता एवढी जागा कुणाच्या घशात जाणार याचीच चिंता आता व्यापारी वर्गाला लागली आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी समजली जाणारी मुंबईची ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. सध्याच्या घडीला नवी मुंबई येथे असणारी बाजारपेठ म्हणजेच एपीएमसी जागेअभावी मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरीत करण्यात आली. या घटनेला आता चाळीस वर्षे उलटून गेली आहेत. या बाजाराला शंभरपेक्षाही अधिक वर्षांची परंपरा आहे. मुंबईच्या मशीद बंदर परिसर तोकडा पडू लागल्यावर तसेच व्यापार वाढत असल्याने जागेची कमतरता जाणवू लागली होती. परिणामी, मुंबईच्या या बाजाराला पर्यायी जागा म्हणून नवी मुंबईचा विचार करण्यात आला.
सध्याच्या घडीला ही जागा हलवण्याच्या अंतर्गत हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळेच अंतर्गत पातळीवर ही जागा आता यापुढे नवी मुंबईतून न्हावा शेवा येथे जाणार ही चर्चा आता सुरु झाली आहे. बाजार समितीमध्ये व्यापारी स्तरावर काही गुप्त बैठकाही पार पडल्या असून, एका खासगी विकासकाशी बोलणीसुद्धा सुरू झाली आहेत.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानात मुलींना शिकवायला महिला आणि नकाब घालणे सक्तीचे!
अनिल परबांचे सहकारी खरमाटेची ईडीकडून ४ तास चौकशी
पेंग्विनच्या कंत्राटासाठी ५० टक्के वाढ कशी झाली?
कांदा-बटाटा बाजार सर्वात पहिल्यांदा इथे स्थलांतरित झाला. त्या पाठोपाठ इतर बाजारांचेही स्थलांतर सुरू झाले आणि त्यानंतर पाचही बाजारांचा व्यापार इथून आजतागायत सुरू आहे. गेल्या चाळीस वर्षात येथील बांधकाम जीर्ण झालेले आहे. त्यामुळेच नवीन बांधकामापेक्षा स्थलांतर करण्याच्या पर्यायाचा विचार सुरू झालेला आहे. उघडपणे यावर अधिकृतपणे कुणीही बोलत नाही. परंतु यासंदर्भात काही व्यापाऱ्यांच्या बैठका झाल्याचे समजते. त्यात दुसरीकडे जाणे कसे सोईस्कर आहे हे व्यापाऱ्यांना समजावून सांगितले जात आहे. व्यापाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न एकप्रकारे केला जात आहे.