राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचे अवमान होण्याचे प्रकार वाढले असताना त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. यासाठी कायदा व्हावा अशी मागणी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीही केली. छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह नेतेमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी या कायद्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर सकारत्मक प्रतिक्रिया दिली. त्याच कार्यक्रमात उदयनराजे यांच्या मागण्या मान्य केल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्या मागण्या केल्या, त्यासंदर्भात सरकारचे त्यांच्याशी बोलणे झालेले आहे. सविस्तर चर्चा केली आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार आहोत. आमचं सर्वांचंच असं मत आहे की, आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. परंतु, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर लोकशाही अनुरूप कारवाई होईल. कठोर नियम करण्याचं आम्ही निश्चित केलं आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारच्या वतीने तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ही मागणी योग्य असून राज्य सरकारच्या वतीने प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. यासाठी निश्चितपणे लवकरच काम हाती घेऊ,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय सर्वोच्च न्यायालयातून आता उच्च न्यायालयात आला आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी लढा देऊन स्मारक उभारण्याच्या मागणीत यश मिळवू. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज असताना देशात आदिलशाही, मोघलाई, कुतबशाही होती. परकीय आक्रमकांचे राज्य कधीच संपणार नाही, असे वाटत होते. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी सूर्य निर्माण झाला. शिवाजी महाराज नसते तर आपण कोणीच नसतो. कारण आपल्यातील तेज जागवण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापन केली.
हे ही वाचा..
जग शिवरायांपासून प्रेरणा घेतंय, महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका
सामाजिक तेढ टाळण्यासाठी छत्रपती शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा
ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित जीसीसीमध्ये मोठी वाढ
तसेच नवी दिल्लीत शिवाजी महाराजांचे स्मारक असले पाहिजे यासाठी गृहमंत्र्यांना भेटून त्यांची मदत घेऊन दिल्लीत स्मारक उभारु, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळाले आहे. आता फ्रान्समध्ये त्यावर सादरीकरण होणार आहे. त्यामुळे या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळेल, अशी आशा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.