अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!

चार लाखांची रोकड आणि ‘मैंने गांधी को नहीं मारा’ची निगेटिव्ह चोरीला

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात दोन अज्ञात चोरांनी प्रवेश करून चार लाख १५ हजार रुपयांची रोकड असलेली तिजोरी आणि सन २००५मध्ये आलेल्या ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटाच्या निगेटिव्हची चोरी केली. बुधवारी मध्यरात्री अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोडवर एका ऑटो-रिक्षात बसून पळून जाताना हे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या चोरांचे चेहरे स्पष्ट दिसावेत, त्यांची ओळख पटावी, यासाठी आंबोली पोलिस सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करत आहेत. या चोरीबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट केले. ‘काल रात्री माझ्या वीरा देसाई रोडच्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडून दोघा चोरांनी संपूर्ण तिजोरीचीच चोरी केली (कदाचित ही तिजोरी तो तोडू शकला नाही). तसेच, आमच्या कंपनीने तयार केलेल्या एका चित्रपटाचे निगेटिव्हदेखील चोरून नेले. चोरांना लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे,’ अशी माहिती खेर यांनी ‘एक्स’वरून दिली.

तिजोरीच्या बॅगेत ठेवलेल्या फिल्म निगेटिव्हच्या चोरीबद्दल खेर यांनी दुःख व्यक्त केले. गेल्या ३० वर्षांपासून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खेर यांचे तीन खोल्यांचे कार्यालय आहे. ‘गुरुवारी सकाळी माझ्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कार्यालयाचे दरवाजे तोडल्याचे आढळले. मुख्य दरवाजा तुटलेला आणि तिजोरी गायब असल्याचे आढळले. मी एका बॅगेत ठेवलेली माझी फिल्मची निगेटिव्ह चोरट्यांनी चोरून नेल्याने मी अस्वस्थ आहे.

हे ही वाचा..

जगभरातील सर्वांत उंच पुलावरून धावली रेल्वे!

सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब लोकसभेचे नवे हंगामी अध्यक्ष

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन

हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड !

पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, ते लवकरच चोरांना पकडतील,’ असे खेर यांनी सांगितले. ही चोरी त्यांचा कर्मचारी विलास सांगू यांच्या लक्षात आली. त्यांनी गुरुवारी सकाळी ९.३५ वाजता या घटनेची माहिती अभिनेत्याचे लेखापाल प्रवीण पाटील (५९) यांना दिली. खेर यांनी कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिजोरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी चार लाख १५ हजारांची रोकड, दोन हजार रुपये किमतीची पिशवी आणि एक तपकिरी रंगाची एक हजार रुपयांची पिशवी होती. त्यात खेर यांनी त्यांच्या चित्रपटाचे निगेटिव्ह जतन केले होते. ‘मी बुधवारी रात्री नऊ वाजता तिजोरीत रोकड ठेवून कार्यालय बंद केले. मध्यरात्री चोरी झाली,’ अशी माहिती पाटील यांनी पोलिसांना दिली.

Exit mobile version