आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात

चाचणी न घेता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड केल्याने अंतिम पंघलचा संताप

आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात

बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीगीरांच्या आंदोलनाचे प्रमुख असलेले कुस्तीगीर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट निवड झाल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. त्यांची चाचणी घेण्यात येणार नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ५३ किलो गटातील कुस्तीगीर अंतिम पंघलने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

 

भारतीय ऑलिम्पिक समितीच्या हंगामी समितीने हा निर्णय घेताना पक्षपात आणि भेदभाव केला आहे असा आक्षेप अंतिमने घेतला आहे. अंतिमने म्हटले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निष्पक्ष चाचणी व्हायला हवी. तिचे वडील म्हणाले की, यासंदर्भात आमच्यावर अन्याय झाला असून पक्षपातीपणा करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे ठरविले आहे. महासंघाच्या विरोधात आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात जात आहोत.

 

हे ही वाचा:

देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात

आंदोलनात उतरलेल्या बजरंग, विनेशची थेट निवड

आता यूपीए नाही ‘इंडिया’

जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली

अंतिम पंघलने २० वर्षांखालील मुलींच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहे. तशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय मुलगी आहे. तिने केलेल्या या कामगिरीनंतरही तिला ५३ किलो वजनी गटात चाचणी न घेतल्यामुळे अन्यायाला सामोरे जावे लागते आहे. या वजनी गटात विनेश फोगाटला थेट प्रवेश देण्यात आला आहे.

 

आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात उभे राहणार असल्यामुळे क्रीडाचाहत्यांना उत्सुकता आहे की, यातून नेमके काय बाहेर येणार? ज्या कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला तेच आता दुसऱ्या खेळाडूंवर अन्याय करत आहेत का, अशी भावना निर्माण होते आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम कुस्तीवर दिसणार आहेत. कारण आगामी काळात ज्या काही चाचण्या होतील त्यावर या निर्णयाची छाप पडेल तसेच खेळाडूंच्या बाबतीत पक्षपात होऊ नये याचा एक इशाराही त्यातून दिला जाऊ शकेल.

 

 

यासंदर्भात अंतिम पंघल म्हणते की, विनेशला पराभूत करण्याची क्षमता माझ्यातच नाही तर अनेक खेळाडूंमध्ये आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचणीत मी विनेशविरोधात ३-३ अशी कामगिरी केली होती. असे असतानाही चाचणी घेतली गेली नाही. मी पण सराव करते आहे. माझे आईवडीलही माझ्यासोबत राहात आहेत. ते माझ्यासाठी त्याग करत आहेत. मग मी कुस्ती सोडायची आहे का? या अन्यायाविरोधात मला साथ द्या. माझी  हात जोडून विनंती आहे की, मला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा.

Exit mobile version