एल्गार या शब्दाचा अर्थ निकराची लढाई किंवा जोरदार हल्ला असा होतो. आता स्वतंत्र भारतात हा एल्गार कशासाठी होतोय? हा प्रश्न खरंतर विचारायचा अधिकार आपल्याला नाही. कारण, समतेचे नारे द्यायचे, जात-पातविरोधात लढाईचा उल्लेख करायचा आणि प्रत्यक्षात फुटीरतावादी भाषणं ठोकायची, समाजात तेढ निर्माण करायची, नक्षली उद्देश सफल करायचा हाच या एल्गार परिषदेत सामील होणाऱ्या तमाम बुद्धिजीवी (?) वर्गाचा उद्देश आहे.
आता पहा ना, अरुंधती रॉय, न्या. बी. जी. कोळसे-पाटील, माजी सनदी अधिकारी कोण तो गोपीनाथ वगैरेंसारखी मंडळी विषारी फुत्कार टाकतात आणि आपले हिंदुत्व न सोडलेले ठाकरे सरकार त्याकडे चक्क काणाडोळा करत राहते. खरंतर, या मंडळींच्या मनातील विखार पाहता यांची सरकारी, सामाजिक कारकीर्द कशी राहिली असेल, हाच प्रश्न भेडसावत राहतो. या सर्व मंडळींचा इतिहास लक्षात घेतला तर कोळसे-पाटीलसारख्या माणसाने न्यायाधीश पदावरून दिलेल्या निकालांभोवती संशयाचं धुकं उभं राहिलं तर आश्चर्य वाटायला नको. त्या गोपीनाथनामक सनदी अधिकाऱ्यानेही आपलं कर्तव्य कोणत्या अर्थाने बजावलं असेल, हेही सांगायला नको. ती अरुंधती रॉयनामक बुकरविजेती लेखिका हिंदू समाजातील जुनाट, संपलेल्या रुढी-परंपरांना पुन्हा चव्हाट्यावर आणताना जिंकलेल्या बुकर पारितोषिकानंतर आजवर कुठलं लिखाण करून विधायक कार्य केलं हे सांगू शकत नाही. आता ही पारितोषिकंही कशी मॅनेज केली जातात, हे सांगणारे मेसेजही व्हायरल होत असतातच. पण त्यावर पण काही न बोललेलंच बरं!
अर्थात, झोलाछाप या लोकांच्या नेतृत्त्वाचा भरणा असलेली एल्गार परिषद शारजिल उस्मानीसारखी विकृत पिढी घडवत आहे. तो शारजील स्टेजवरून बोलतो की, हिंदुस्थानमधला हिंदू समाज वाईट पद्धतीने सडलाय. जुनैदला ट्रेनमध्ये जमाव ३१ वेळा चाकूने भोसकून मारते म्हणून हिंदू समाज सडलाय असा निष्कर्ष तो काढतो. योगायोग म्हणजे त्याचवेळेला त्याच्या मागे अरुंधती रॉयचे स्टेजवर आगमन होते. आता एखाद्या गुन्हेगारी कृत्यामुळे अख्खा हिंदू समाज सडल्याचा निष्कर्ष हा मुस्लिम तरुण काढतो आणि जाहीरपणे जहरीपणे मांडतो. त्याला कुणीही अडवत नाही, कुणीही टोकत नाही. म्हणजेच, यावरून समाजात तेढ निर्माण व्हावी असंच या एल्गारवाल्यांना वाटतंय ना?
आता असा अर्थ आपण काढला तर आपण मात्र जातीयवादी ठरतो आणि जाहीरपणे ही मुक्ताफळं उधळणारी ही एल्गारी जमात मात्र समतावादी ठरते, याला काय म्हणावे? पण, या एल्गार परिषदेला परवानगी देणाऱ्या पुणे पोलिसांना, गृहखात्याला याची जबाबदारी घ्यायला हवी. किमान हिंदुत्व सोडलं नाही वगैरे थापा मारणाऱ्या शिवसेनेनं तरी या शरजीलवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरावे. नाहीतर, हिंदू समाजाचा ठेका फक्त भाजपानेच घेतलाय का, या त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिल्यासारखं होईल.
पण, ३१ जानेवारीला झालेल्या या वक्त्वव्यानंतर भलेभले बुद्धीवादी यावर मूग गिळून गप्प बसलेत. कोणत्याही तथाकथित लोकांसाठीच्या वर्तमानपत्रांनी या बातमीची फारशी दखल घेतली नाही. आता त्यावर काही विद्वान नेहमीप्रमाणे म्हणतील की, अशा गोष्टींना प्रसिद्धी देणं टाळण्यातच शहाणपणा असतो. पण, हे काही खरं नाही. प्रसिद्धी टाळू शकाल एकवेळ पण पुण्यासारख्या ठिकाणी व्यासपीठावर जाहीरपणे विषारी फुत्कार टाकण्याची ही हिंमत तुम्ही थांबवू शकणार आहात का?
यावर एकच उपाय आहे तो म्हणजे अशा नक्षली, देशद्रोही विचारांच्या मंडळींना आता जनतेनेच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. अर्थात, सोशल मीडियावरून लोकांनीच हा प्रकार समोर आणला आणि निषेधाचे हत्यारही उपसले. त्यानंतर भाजपाने कारवाईची मागणी केलीये. पण, एवढ्यानं भागणार नाही. ही केवळ कारवाईपुरती बाब नाही. एल्गारच्या नावाखाली पोसली जाणारी ही देशद्रोही, समाजविघातक जमात वाढू न देण्यासाठी कायद्याचा बडगा तर हवाच पण समाजानेही आता अशा भंपकांना त्यांची जागा दाखवायला हवी.
तशी सुरुवात तर २०१४ सालीच झाली आहे. आता ही जमातही पूर्ण ताकदीनिशी पलटवार करण्याचा प्रयत्न करतेय हेही शाहीनबाग, शेतकरी आंदोलन, एल्गार परिषदसारख्या गोष्टींमधून दिसतंय. पण, तमाम हिंदूंनी, राष्ट्रवादी जनतेनं या विषारी मंडळींना आता जराही थारा देऊ नये. हिंदुत्वाकडून फुरोगामीत्वाकडे वळलेले सोबत असो वा नसो, आपण मात्र आपला मार्ग चोखाळून वाटचाल करत राहिलं पाहिजे.
– मंत्रज्ञ
एल्गार आता गार होत चाललाय. दोनेकशेच माणसे ते जमवू शकले म्हणे. नैराश्यातून गरळ ओकताहेत ते. जनमानसात काहीही स्थान नाही. तरीही त्यांचे सत्यस्वरूप बाहेर आणून त्यांना तोडीस तोड उत्तर दिलेच पाहिजे.