प्रॉपल्शन मोड्युलला अलविदा; विक्रम लँडर चंद्राकडे झेपावला!

चांद्रयान-३ लवकरच चंद्रावर उतरणार

प्रॉपल्शन मोड्युलला अलविदा; विक्रम लँडर चंद्राकडे झेपावला!

इस्त्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान- ३’ मधील महत्त्वाचा टप्पा गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी पार पडला. चांद्रयानातील प्रॉपल्शन मॉड्यूल आणि विक्रम लँडर हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. आता पुढे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करणार असून प्रॉपल्शन मॉडेल चंद्राच्या भोवती फिरत राहणार आहे. इस्रोने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

इस्रोने ट्वीट करत लिहिलं आहे की, “लँडर मॉड्यूल (एलएम) म्हणाले की, ‘प्रवासासाठी धन्यवाद, मित्रा!’ लँडर मॉड्यूल (LM) प्रॉपल्शन मॉड्यूल (PM) पासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता नियोजित डीबूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल (LM) चंद्रापासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येईल.

जुलै महिन्याच्या १४ तारखेला चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. अनेक यशस्वी टप्पे पार करत हे लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ पोहोचलं असून, १८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमाराला डीबूस्टिंग प्रक्रिया पार पडणार आहे. विक्रम लँडरच्या आतमध्येच प्रज्ञान रोव्हर आहे. २३ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर रोव्हर बाहेर येईल, आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन माहिती गोळा करेल.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जर सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.”

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या पाक क्रिकेट संघाच्या व्हिडीओत इम्रानच होता गायब…

डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे निधन

दिल्लीवरून ‘इंडिया’मध्ये संघर्ष

मुख्यमंत्र्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न कोणाचा?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राभोवती भारताचे तीन उपग्रह असून यामध्ये चांद्रयान-१, चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ च्या प्रॉपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. लँडर मॉड्यूलला चंद्रापर्यंत पोहोचवल्यानंतर प्रॉपल्शन मॉड्यूलचे काम संपणार नाही. आता पुढील कित्येक वर्षांपर्यंत हे मॉड्यूल चंद्राभोवती फिरत राहणार आहेत. यामध्ये असलेल्या एसएचएपीई उपकरणाच्या माध्यमातून हे पृथ्वीच्या वातावरणाचा स्पेक्ट्रोस्कोपिक अभ्यास करेल. तसेच, पृथ्वीवरील ढगांच्या माध्यमातून ध्रुवीकरणातील फरक याचा अभ्यास देखील हे करणार आहे. यातून मिळालेल्या माहितीचा वापर हा मानवी वसाहतीसाठी योग्य असणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बंगळुरूमधील यू. आर. राव सॅटेलाईट सेंटर आणि इस्रोने संयुक्तपणे या उपकरणाची निर्मिती केली आहे.

Exit mobile version