अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!

तरुणीच्या शोधासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!

२८ मे रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातून २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी निशीथा कंदुला बेपत्ता झाली आहे. सॅन बर्नार्डिनो येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या पोलिसांनी या विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अमेरिकेत अलीकडच्या काही महिन्यांत भारतीय विद्यार्थ्यांशी संबंधित अशीच अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

रविवारी, २ जून रोजी सीएसयूएसबीचे पोलिस प्रमुख जॉन गुटिएरेझ यांनी निशिथा ही लॉस एंजेलिसमध्ये शेवटची दिसली होती आणि ती ३० मे रोजी बेपत्ता झाली होती, असे ‘एक्स’वर नमूद केले आहे. पोलिसांच्या लेखी निवेदनानुसार, बेपत्ता भारतीय विद्यार्थिनीची उंची पाच फूट सहा इंच आहे, तर, तिचे वजन सुमारे ७२.५ किलो आहे. तिचे केस आणि डोळे काळे आहेत. निशीथा कंदुला कॅलिफोर्नियामध्ये परवाना असलेली टोयोटा कोरोला चालवत होती.

या वर्षी एप्रिलमध्ये अशीच एक घटना घडली होती. या वर्षी मार्चपासून बेपत्ता असलेला २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफत अमेरिकेच्या ओहायो राज्यात मृतावस्थेत आढळला होता. मूळचा हैदराबादचा रहिवासी असलेला अराफत हा क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटी विषयातील पदव्युत्तर पदवीसाठी अमेरिकेला गेला होता, तो यावर्षी ७ मार्चपासून बेपत्ता होता. त्याचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, १० दिवसांनंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला, ज्याने अराफतचे अपहरण केल्याचा दावा केला आणि त्याच्या सुटकेसाठी १२०० अमेरिकी डॉलर खंडणीची मागणी केली.

यापूर्वी ५ एप्रिल रोजी अमेरिकेच्या ओहायो राज्यात उमा सत्य साई गडदे नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे.बोस्टन विद्यापीठातील २३ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी, परचुरी अभिजित हा यावर्षी ११ मार्च रोजी एका गाडीमध्ये मृतावस्थेत आढळला होता. तो मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेमचा होता. अज्ञात हल्लेखोरांनी अभिजितची हत्या केल्याचे समजते. २७ फेब्रुवारी रोजी सेंट लुईस अकादमी परिसरात भारतीय नृत्यांगना अमरनाथ घोष यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा धडा!

निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांनी एक आठवड्याची मागितलेली मुदत नाकारली

मुख्य प्रशिक्षक म्हणून टी २० विश्वचषक ही द्रविडची शेवटची स्पर्धा!

‘हमारे बारह’च्या टीमला पोलिस संरक्षण

२ फेब्रुवारी रोजी, विवेक तनेजा नावाच्या ४१ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा अमेरिकेच्या वॉशिंग्टनच्या डाउनटाउनमध्ये अज्ञात व्यक्तीने केलेल्या गंभीर हल्ल्यानंतर मृत्यू झाला.एका दिवसापूर्वी, लिंडनर स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवीचे शिक्षण घेत असलेल्या श्रेयस रेड्डी बेनिंगेरीचा ओहायोमध्ये मृत्यू झाला. इंडियाना येथील पर्ड्यू विद्यापीठात दुहेरी पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी नील आचार्य ३१ जानेवारी रोजी बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. यापूर्वी २० जानेवारी रोजी अकुल धवन हा १८ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी इलिनॉय विद्यापीठाजवळ मृतावस्थेत आढळला होता. नाईट क्लबमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर त्याचा गारठून मृत्यू झाला.

या वर्षी १६ जानेवारी रोजी अमेरिकेतील लिथोनिया, जॉर्जिया येथे एका दुकानात एका बेघर माणसाने हातोड्याने वारंवार वार करून आणखी एक भारतीय विद्यार्थी विवेक सैनीची निर्घृणपणे हत्या केली होती. निकेश आणि गट्टू दिनेश नावाचे दोन विद्यार्थी १४ जानेवारी २०२४ रोजी युनायटेड स्टेट्समधील कनेक्टिकट येथे त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. ते सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते आणि ‘कार्बन मोनॉक्साईड विषबाधा’मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.गूढ मृत्यूच्या ११ प्रकरणांव्यतिरिक्त, समीर कामथ नावाच्या एका भारतीय विद्यार्थ्याने ५ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली तर वेंकटरामन पित्तला नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा जेट-स्की अपघातात मृत्यू झाला.

Exit mobile version