अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी दिली आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.उमा सत्य साई गड्डे असे मृताचे नाव आहे. या बद्दल न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्सवर एक पोस्ट करून हि माहिती दिली आहे. वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याचे पार्थिव लवकरच भारतात नेण्यात येणार आहे.
अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच ही घटना घडली आहे. यापूर्वी मार्चमध्ये, एक २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या क्लीव्हलँड परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे त्यांच्या मुलाचा शोध घेण्याची विनंती केली होती. मोहम्मद अब्दुल अराफात हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून तो मे २०२३ मध्ये क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता परंतु ७ मार्च २०२४ पासून तो बेपत्ता आहे. त्याचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, १० दिवसांनंतर त्यांना एक फोन आला जिथे ती व्यक्ती सांगत होती की त्यांच्या मुलाचे (अब्दुल अराफत) अपहरण करण्यात आले आहे आणि १२०० डॉलर्सची खंडणी मागितली आहे.
हेही वाचा..
सुप्रिया श्रीनाते यांची पुनावाला यांच्यावर अपमानास्पद टीका
कमलनाथ यांच्या ‘हनुमाना’चा भाजपमध्ये प्रवेश!
भारत मालदीवला पाठवणार आवश्यक वस्तू!
यापूर्वी सुद्धा फेब्रुवारीमध्ये शिकागोमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. हल्ल्यानंतर शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, ते पीडित सय्यद मजहीर अली तसेच त्याच्या पत्नीच्या भारतात संपर्कात होते. भारतीय मिशनने हैदराबादचा राहणारा अली आणि त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे त्याने या भीषण घटनेचे वर्णन केले आहे. दरम्यान ३० जानेवारी रोजी पर्ड्यू विद्यापीठातील नील आचार्य हा विद्यार्थी अनेक दिवस बेपत्ता झाल्यानंतर मृतावस्थेत सापडला होता, असे टिपेकॅनो काउंटी कॉरोनरने सांगितले. तसेच २९ जानेवारी रोजी विवेक सैनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेतील लिथोनिया जॉर्जिया येथे एका दुकानात एका बेघर माणसाने हातोड्याने वारंवार वार करून निर्घृणपणे ठार मारले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र या घटनेची नेमकी तारीख कोणती? हे समजू शकले नाही.