मुंबईतील वरळीमध्ये हिट अँड रनचे प्रकरण घडले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आलिशान गाडीने फरफटत नेल्यामुळे वरळीमधील रहिवासी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. एका व्यावसायिकाच्या बीएमडब्लू गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड (वय २८ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.
वरळी सीफेसजवळ ए. जी. खान अब्दुल गफारखान मार्गावर २० जुलै रौजी कार्यालयातून घरी परतत असताना विनोदच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू मोटारगाडीने मागून जोरदार धडक दिली. तो खाली पडून डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने त्याला नायर रुग्णालयात दाखल. तेथे विनोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त गाडी ठाण्यातील एका अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर आली. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी हा व्यावसायिक वरळीमध्ये आला होता. अपघात झाला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर गाडी चालवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
भारतीय नेमबाजांची कमाल, रमिता नंतर अर्जुनही अंतिम फेरीत !
भारताला नमवून श्रीलंकन महिलांनी मिळविला आशिया चषक
मनू भाकर म्हणते, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या मार्गावर चालले!
…तर जगात मनुष्यबळ पुरवण्यात भारत विश्वगुरू बनेल!
विनोद लाड हा मूळचा मालवणचा रहिवासी असून तो ठाण्यामध्ये एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या लहानपणीच आई- वडिलांचे निधन झाले होते. त्याने आपल्या परिस्थतीवर मात करत अत्यंत मेहनतीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शिवाय स्वतःच्या हिंमतीवर नोकरी मिळविली होती. विनोद हिल रोड येथे आपल्या चुलत बहिणीकडे राहात होता. डिसेंबरमध्ये विनोदचा विवाह होणार होता. त्यासाठी त्याने अलीकडेच मंगळसूत्र आणि अंगठीही खरेदी केली होती, अशी माहिती त्याचे मेहुणे सूर्यकांत जाधव यांनी दिली आहे.