आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू

गेल्या पाच महिन्यांतील सातवी घटना

आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतून आणलेला आणि मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात ठेवलेला आणखी एक तेजस नावाच्या चित्त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. याआधी तीन चित्ते आणि तीन बछड्यांचा अभयारण्यात मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका निरीक्षण पथकाला मंगळवारी सकाळी ११ वाजता नर चित्त्याच्या मानेच्या वरच्या भागावर जखमेच्या खुणा आढळल्या. तर, दुपारी दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

सकाळी ११ वाजता चित्त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळल्यानंतर तातडीने निरीक्षण पथकाने पलपूर मुख्यालयात असणाऱ्या वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाला कळवले. हे पथक तातडीने आले. त्यांनी या चित्त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यात या चित्त्याला गंभीर जखम झाल्याचे आढळून आले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्राथमिक मंजुऱ्या मिळवण्यात आल्या आणि वैद्यकीय पथक आवश्यक त्या वैद्यकीय साहित्यासह तेजसवर उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र, दोन वाजता तेजसने प्राण सोडला.

तेजस हा चित्ता घटनास्थळी मृत आढळला. तेजसला नेमक्या कशामुळे जखमा झाल्या, याचा तपास करण्यात येत आहे. आता शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल,’ असे अभयारण्यातर्फे जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात

पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे हाहाःकार; ८६ जणांचा मृत्यू

२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना

उत्तर प्रदेशातील शाळा-कॉलेजची ‘सफाई’; व्यवस्थापकीय मंडळातून गुंड, माफिया बाहेर

दोन नर जातीच्या चित्त्यांना अभयारण्यात सोडल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडली आहे. गेल्या वर्षी आठ नामिबियन चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडण्यात आले होते. तर, या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी आणखी सात नर आणि पाच मादी चित्ते दक्षिण आफ्रिकेतून कुनो अभयारण्यात आणण्यात आले होते.

Exit mobile version