महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना पुण्यात आणखी एक हिट अँड रनची घटना घडली आहे. मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिस दलातील एका हवालदाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिस पुलाखाली सोमवारी(८ जुलै) पहाटे २ वाजता हा अपघात झाला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेले दोन पोलीस हवालदार त्यांच्या दुचाकीवरून रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद
इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !
हरियाणामध्ये मिनी बस पलटून ४० हून अधिक विद्यार्थी जखमी
मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका; रेल्वे रुळांवरून चालत गाठले स्थानक
या दुर्घटनेत पोलीस हवालदार समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर हवालदार संजोग शिंदे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, मुंबईतील वरळीतील देखील काल हिट अँड रनची घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अपघातावेळी कारमध्ये उपस्थित असणाऱ्या मिहीर शाह नामक व्यक्तीचा शोध सुरु आहे.