यूएईमध्ये होणार असलेल्या टी २० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाच्या हेड कोच (मुख्य प्रशिक्षक) पदाची जबाबदारी अनिल कुंबळेकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासाठी कुंबळेच्या नेतृत्वात आणखी तीन कोचची नियुक्ती केली जाण्याचीही शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा देशातील माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या कोच पदांसाठी चर्चेत आहेत.
कराराची मुदत संपणार आहे आणि बीसीसीआयने मुदतवाढीची तयारी दाखवली असली तरी रवी शास्त्रीने पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टी २० वर्ल्ड कप नंतर रवी शास्त्री आणि टीम इंडियासाठी कोचिंग करणारे त्याचे सहकारी या सर्वांची मुदत संपणार आहे. बीसीसीआय वर्ल्ड कप नंतरच्या स्पर्धांचा विचार करुन हेड कोच तसेच फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासाठीचे कोच या करिता नव्या पर्यायांचा विचार करत आहे.
रवी शास्त्री पाठोपाठ विराट कोहलीनेही टी २० वर्ल्ड कप नंतर भारताच्या टी २० टीमचे कॅप्टन पद सोडणार असल्याची घोषणा करणारे ट्वीट केले आहे. यामुळे बीसीसीआय नव्या टी २० कॅप्टनचाही शोध घेत आहेत. या पदासाठी टीम इंडियाचा उप कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचे नाव आघाडीवर आहे.
हे ही वाचा:
हे हल्ले दहशतवाद्यांची निराशा दर्शवतात
न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडकडचाही पाकिस्तान दौरा रद्द?
अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी
पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले
कोच पदासाठी अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोन नावांची चर्चा आहे. पण कुंबळेला हेड कोच म्हणून संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. याआधी अनिल कुंबळे टीम इंडियाचा हेड कोच होता. पण कोहलीच्या दबावामुळे कुंबळेने तडकाफडकी राजीनामा दिला होता. राजीनामा देताना कुंबळेने जास्त बोलणे टाळले पण माझ्या कोच पदाच्या इनिंगची अखेर आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकली असती असे सूतोवाच केले होते.