अनिल देशमुख आज, २६ ऑगस्टला आर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर देशमुखांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याने आणि त्रास जास्त असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली होती. तुरुंगात असताना अचानक अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागले आणि ते चक्कर येऊन पडले. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना याची माहिती दिली. मात्र, त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशमुख यांना आणखी काही दिवस जे जे रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा देशमुख यांना असाच त्रास झाला होता. त्यावेळी त्यांना सुरुवातीला जे जे रुग्णालयात व नंतर केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा:
दोन वर्षानंतर बोरिवलीत सलग पाचव्यांदा रंगणार फाल्गुनीचा गरबा
गुलाम आझाद यांचा काँग्रेसला रामराम, स्थापन करणार नवा पक्ष
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती
मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज
दरम्यान, अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे गृहमंत्री होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरु केली. अखेर अनिल देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात होते.