महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले आहे. अटकेत असल्यामुळे त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. त्यांना कोणता त्रास असेल तर त्यांना त्यानुसार औषधोपचार करता यावेत म्हणून ही चाचणी केली जाणार आहे.
१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडीची कोठडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ईडीच्या न्यायालयात अनिल देशमुख हे वयोवृद्ध असून त्यांना विविध व्याधी असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे आवश्यक असल्यामुळे ही चाचणी करण्यात येणार आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप ठेवले होते. तसे पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्या आधारावर देशमुख यांना ईडीने समन्स पाठविले होते. पण पाचवेळा समन्स पाठवूनही ईडीसमोर देशमुख कधी हजर झाले नाहीत.
हे ही वाचा:
लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या
पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल
भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट
नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन: वाईटाचा वध करून सकारात्मकतेचा दिवस
सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे आपण उपस्थित राहणार नाही, असे देशमुखांकडून सांगितले जात होते. पण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ईडीसमोर उपस्थित राहण्यावाचून पर्याय नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर देशमुख तिथे हजर झाले. सकाळी ११.३० वाजता ते ईडी कार्यालयात दाखल झाले. तब्बल १२ तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना मध्यरात्री उशिरा अटक करण्यात आली.