…आणि रेल्वेमंत्र्यांनीच ट्विट बघून केली कारवाई

…आणि रेल्वेमंत्र्यांनीच ट्विट बघून केली कारवाई

रेल्वेत धूम्रपान करण्यास मनाई आहे. याची दखल तातडीने घेतली जाईलच असेही नसते. पण थेट मंत्र्यांकडूनच ती घेतली गेली तर मात्र त्याचे कौतुक होते. रामनगर ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये असेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कुणीतरी ट्विट केले आणि त्याची दखल घेतली गेली. काय आहे ते प्रकरण?

रामनगर ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून करोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. ती व्यक्ती धूम्रपानही करत होती. त्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या प्रवाशाने चक्क गाडीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढून ही माहिती थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाच ट्विट केली. त्यानंतर या ट्विटची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाईचे आदेश दिले आहेत. आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन )अधिकारी व रेल्वे पोलिसांनी गाडीत प्रवेश करून कंत्राटदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच गाडीत रेलनीरऐवजी खासगी कंपनीच्या बाटलीबंद पाण्याचीही वीस रुपयांना विक्री केली जात होती. ही बाबही निदर्शनास आणली.

हे ही वाचा:

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

…म्हणून मीराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत पिझ्झा

शाळांविरोधातील तक्रारीसाठी पालकांच्याच खिशाला चाट

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

होशियार सिंह दसोनी हे वसईचे रहिवासी आहेत. कामानिमित्त उत्तराखंडला ते गेले होते. मुंबईमध्ये परतताना त्यांनी सायंकाळी ६.३० वाजता रामनगर ते वांद्रे टर्मिनस गाडी लाल कुआ स्थानकातून पकडली. परंतु वातानुकूलित डब्यात गाडीत पाणी तसेच खाद्यपदार्थ देणारे कंत्राटदाराचे कर्मचारी मुखपट्टीशिवाय फिरत असल्याचे आढळले. संबंधित कर्मचारी वर्गाला मुखपट्टीबाबत विनंती केली, परंतु त्यांच्या सूचना कुणीच गांभीर्यांने घेतल्या नाहीत. रेल्वे डब्यातही एका कोपऱ्यात बसून तीन ते चार कर्मचारी धूम्रपानही करत होते.

ही माहिती दसोनी यांनी रात्रीच रेल्वेमंत्र्यांना ट्वीट करून दिली व कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी सकाळी रतलामजवळ गाडी थांबताच आयआरसीटीसीचे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी दसोनी यांची भेट घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदाराला बोलावून करोना नियमांचे उल्लंघन आणि अन्य नियमावली न पाळल्याने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Exit mobile version