मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील घोषी पट्टी गावातून १९९८ मध्ये म्हणजेच २३ वर्षांपूर्वी प्रल्हाद सिंग नावाचा युवक बेपत्ता झाला होता. या युवकाची मानसिक स्थितीही ठीक नव्हती. बेपत्ता झाल्यावर हा युवक कुठे आहे, जिवंत आहे की नाही, पुन्हा कधी हा घरी येईल याची आशाच कुटुंबीयांनी सोडून दिली होती.
प्रल्हाद सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात असल्याची खबर त्याच्या कुटुंबियांना मिळाली. मात्र प्रल्हादबद्दल माहिती मिळाल्याचा आनंद व्यक्त करायचा की, तो पाकिस्तानमध्ये आहे याचे दुःख व्यक्त करायचे अशा संभ्रमात कुटुंब पडले.
प्रल्हाद पाकिस्तानमधील तुरुंगात आहे ही माहिती कळताच प्रल्हाद यांचे भाऊ वीर सिंग यांनी प्रल्हाद यांना सोडवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आणि तब्बल २३ वर्षांनंतर प्रल्हाद सिंग यांनी पुन्हा एकदा भारताच्या भूमीवर पाय ठेवले. प्रल्हाद यांचे अर्धे आयुष्य पाकिस्तानच्या तुरुंगात गेले. पण निदान पुढील आयुष्य त्यांचे चांगले जाईल, अशी आशा वीर यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी
पुणे- कोल्हापूर प्रवास फक्त अडीच तासात…
सोमवारी पाकिस्तानने प्रल्हाद आणि अजून काही भारतीयांना रावळपिंडी मध्यवर्ती कारागृहातून वाघा बोर्डरवर बीएसएफकडे सुपूर्द केले. प्रल्हाद यांना पाकिस्तानने २३ वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधून ताब्यात घेतले होते. त्यांच्या आधीच बिघडलेल्या मानसिक स्थितीचा विचार न करता त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांची स्थिती अधिकच वाईट आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रल्हाद यांच्या सोबत सुटका झालेल्या इतर भारतीयांच्या कुटुंबाची माहिती अद्याप मिळालेली नाही.