महिंद्रा म्हणतात, मोदी सरकारमुळे पद्म पुरस्काराचे रूप पालटले

महिंद्रा म्हणतात, मोदी सरकारमुळे पद्म पुरस्काराचे रूप पालटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पद्म पुरस्कारांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केले आहेत. खरे तर, गेले अनेक वर्षांपासून या बदलांची आवश्यकता होती. समाजाच्या विकासासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्याची दखल घेण्यावर या सरकारने प्रामुख्याने भर दिला आहे, अशा शब्दांत उद्योगपती आनंद महिंद्र यांनी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यावर मोदी सरकारच्या निर्णयाची प्रशंसा केली. पण या पुरस्कारविजेत्यांमध्ये मी स्वतःला पात्र समजत नाही, अशी टिप्पणीही महिंद्र यांनी केली.

यंदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आलेल्या पुरस्कारविजेत्यांमध्ये अनोळखी चेहऱ्यांची पण त्यांनी केलेल्या अफाट कार्याची दखल घेतली गेली. त्यामुळे या पुरस्कारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पुरस्कारविजेत्यांमध्ये एकूण ११९ जणांचा समावेश होता पण काही चेहरे हे अगदी तळागाळातील होते, ज्यांचे कार्य मात्र डोंगराएवढे मोठे आहे.

कर्नाटकच्या ७२ वर्षीय आदिवासी महिला तुलसी गौडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना जंगलातील एन्सायक्लोपीडिया म्हटले जाते. त्यांना जंगलातील विविध वनस्पतींचे प्रचंड ज्ञान आहे. १२ वर्षांची असल्यापासून त्यांनी अनेक रोपे लावली. आता जवळपास ३० हजार रोपे त्यांनी लावून एक विक्रमच केला आहे. पर्यावरणाप्रती दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांचा गौरव पद्म पुरस्कार देऊन करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आस्थेने चौकशी केल्याचा फोटो खूप व्हायरल झाला होता.

अशीच आणखी एक व्यक्ती आहे ती मंगळुरू येथील ६८ वर्षीय हरेकाला हजब्बा. त्यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. संत्री विकून ते रोज १५० रुपये कमावतात पण एवढी तुटपुंजी कमाई असतानाही त्यांनी एक प्राथमिक शाळा उभी केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार घेण्यासाठी ते सफेद शर्ट आणि धोतर घालून पोहोचले. त्यांचा हा साधेपणा सगळ्यांनाच भावला होता.

अयोध्या येथे राहणाऱ्या ८३ वर्षीय सायकली मॅकेनिक मोहम्मद शरीफ यांनाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शरीफ चाचा म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत २५ हजार पेक्षा अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. १९९२मध्ये त्यांच्या मुलाची हत्या झाली होती. त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर बेवारस पडला होता. तेव्हापासून त्यांनी अशा बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. केवळ मुस्लीम नव्हे तर सर्व धर्मातील अशा मृतदेहांवर ते अंत्यसंस्कार करतात.

 

हे ही वाचा:

अनिल देशमुखांचा ईडी मुक्काम ३ दिवसांनी वाढला

‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’

सुप्रिया सुळे अनिल देशमुखांच्या भेटीला?

सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर

 

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील बीज माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वकौशल्याच्या जोरावर दोन दशकांपूर्वी त्यांनी देशी बियाणे तयार करून त्यांचे वाटप करायला प्रारंभ सुरू केला. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी देशी बियाणांच्या संरक्षणासाठी प्रचार आणि प्रसार सुरू केला. तेव्हापासून त्यांना बीजमाता म्हणून लोक ओळखू लागले. आता राहीबाई यांच्याकडे एक बियाण्यांची बँक आहे ज्यात २०० प्रकारच्या देशी बियाणे आहे.

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील हिंमताराम भांभू हे २५ वर्षे झाडांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत ५ लाख रोपे लावली आहेत. त्यासाठीच त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

Exit mobile version