या सहा भारतीय क्रिकेटपटूंना आनंद महिंद्रांनी दिली विशेष भेट

या सहा भारतीय क्रिकेटपटूंना आनंद महिंद्रांनी दिली विशेष भेट

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शनिवारी सहा भारतीय क्रिकेटपटूंना विशेष भेट जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियन संघाला हरवण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवली. या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सहा खेळाडूंना कौतुकाची थाप म्हणून महिंद्रा यांच्यातर्फे ही भेटवस्तू दिली जाणार आहे. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या महिंद्रा यांनी शनिवारी दुपारी ट्विटरच्या माध्यमातून या विषयीची घोषणा केली.

आनंद महिंद्रा यांनी घोषित केलेली ही विशेष भेटवस्तू म्हणजे महिंद्रा कंपनीची ‘थार’ ही एसयूव्ही प्रकाराची गाडी असणार आहे. महिंद्रा यांनी भारतीय संघाच्या सहा तरुण खेळाडूंना ही भेट जाहीर केली आहे. हे सहा खेळाडू म्हणजे शुभमन गिल, मोहम्मद सिराज,  टी.नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर हे आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची बॉर्डर-गावस्कर चषकाची मालिका ही खूपच नाट्यमय ठरली. एकीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर मायदेशी परतला होता, तर दुसरीकडे भारतीय संघाचे अनेक महत्वाचे अनुभवी खेळाडू हे दुखापतीने त्रस्त होते. अशा परिस्थितीत या सहा तरुण खेळाडूंनी संघाच्या विजयात अतिशय मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे या सहा जणांपैकी शार्दुल ठाकूर वगळता बाकीच्या खेळाडूंची ही पहिलीच कसोटी मालिका होती.

भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंवर ऑस्ट्रेलियातील मालिका विजयासाठी कौतुकाचा वर्षाव होत असताना, या नव्या दमाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महिंद्रा यांनी ‘थार’ ही गाडी भेट म्हणून जाहीर केली आहे. “या खेळाडूंच्या कहाण्या म्हणजे यशाच्या मार्गावर संकटांना मात देऊन उभे राहण्याच्या कथा आहेत.” असे महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. या भेटीमागचे खरे कारण तरुणांना स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आणि नवीन वाटा धुंडाळाण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे असे महिंद्रांनी सांगितले. उद्योगपती आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते असून ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा क्रिकेटवर भाष्य करत असतात.

Exit mobile version