मातृदिनी आनंद महिंद्रनी दिले ‘इडली अम्मा’ला नवे घर!

मातृदिनी आनंद महिंद्रनी दिले ‘इडली अम्मा’ला नवे घर!

नवे, काही अनोखे करणाऱ्यांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे, त्यांच्या कामाची विशेषकरून दखल घेणारे महिंद्र उद्योगसमुहाचे प्रमुख आनंद महिंद्र यांनी गेल्या वर्षी दिलेले वचन यंदा पूर्ण केले. त्यांनी जी वचनपूर्ती केली, त्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आनंदाने भरून आल्याशिवाय राहणार नाहीत.

तामिळनाडूमधील कमलथाल या आजींसाठी आनंद महिंद्र यांनी नवेकोरे घरच बांधून दिले. मातृदिनाच्या निमित्ताने त्यांनी ही वचनपूर्ती केली.

त्याचे झाले असे की गेली ३७ वर्षे अवघ्या १ रुपयात इडली सांबार चटणी विकणाऱ्या या आजींना चांगले घर नव्हते. तामिळनाडूतल्या वडीवेलमपल्लयम येथे त्या राहतात. २०१९मध्ये त्यांची ही कहाणी सर्वत्र व्हायरल झाली आणि महिंद्र यांनी त्याची दखल घेत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या छोटया उद्योगात गुंतवणूक करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखविली. शेवटी त्यांनी या आजींना नवे घर देऊन आपले वचन पूर्ण केले. त्या आपल्या नातेवाईकांसह नव्या घरात प्रवेश करतानाचा व्हीडिओ महिंद्र यांनी शेअर केला, तेव्हा त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या ‘सोशल सैनिकांना’ संजय राऊतांचे शिव्यांचे धडे

टाटा कंझ्युमर… एकदम कडॅक!

ताजमहालमधील बंद खोल्यांमध्ये काय आहे?, उच्च न्यायालयात केली याचिका

सरकारचा सवाल! WHO आर यू?

 

अनेकांनी आपली मते व्यक्त करत आनंद महिंद्र यांची प्रशंसा केली. एकाने म्हटले की, जगात चांगली माणसे दुर्मिळ आहेत. आनंदजी तुम्ही केलेल्या या कृतीमुळे माझ्या डोळ्यात अश्रु आले. धन्यवाद आनंदजी. एकाने म्हटले आहे की, इडली अम्माकडून आशीर्वाद मिळणे म्हणजे प्रत्यक्ष देवाकडून आशीर्वाद मिळण्यासारखे आहे. कमी वेळात तुम्ही ही वचनपूर्ती केलीत त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार. एकाने लिहिले आहे की, तुमचे आभार. तुम्ही एक उद्योगपती आहात, व्यापारी नाही. तुम्हाला दीर्घ आयुरारोग्य लाभो.

इडली अम्मा रोज सकाळपासून या इडली सांबार बनवतात. विशेषकरून रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी त्यांनी अवघ्या १ रुपयात ही योजना सुरू केली आहे.

Exit mobile version