टाटा समूहाचे माजी संचालक आणि उद्याोजक सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यावेळी नानाविध आरोप करण्यात आले होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ४ सप्टेंबरला सायरस यांच्या मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता या अपघाताबद्दल मोठा खुलासा समोर आला आहे. अपघातावेळी अनाहिता पंडोल या कार चालवत होत्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. निष्काळजीपणे आणि अतिवेगात कार चालवल्याप्रकरणी अनाहिता यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अनाहिता यांच्यावर याआधीही अतिवेगाने गाडी चालवल्याप्रकरणी एक नाही तर जवळजवळ सातवेळा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
अनाहिता पंडोळ यांच्याबाबत पोलिसांनी आणखी एक दावा केला आहे. अनाहिता यांनी यापूर्वीही अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले आहे. २००२ ते २०२२ पर्यंत त्यांच्यावर अनेकवेळा अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चलान कापण्यात आले आहे. मिस्त्री कार अपघातप्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पोलिसांना तपासादरम्यान या धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अनाहिता यांचा हा निष्काळजीपणाही आरोपपत्रात नमूद करण्यात येणार आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही चालान त्याच मर्सिडीज बेंझ कारला जारी करण्यात आली होती, ज्या कारमध्ये सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
उद्या मुंबईमध्ये भाजपाचा ‘माफी मांगो’ मोर्चा
लग्नमंडपातून फरफटत आणत, मुलीला फासावर लटकवले
पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं
ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल
अनाहिता पंडोल यांच्या विरोधात कासा पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स.कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, सह मोटार वाहन कायदा कलम ११२ / १८३, १८४, मोटार वाहन चालक नियम १४,०५, ०६/१७७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे आणि अतिवेगात कार चालवल्याप्रकरणी अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नाहिता या रुग्णालयात दाखल असून त्यांना डिस्चार्ज मिळताच पोलिस त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. तेव्हा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अपघातानंतर अनाहिता या जबर जखमी झाल्या होत्या. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.