शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे आज, १४ ऑगस्ट रोजी पहाटे अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचाादरम्यान विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली आहे.
पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी विनायक मेटे यांचा अपघात झाला. मात्र सुमारे एक तास त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. यादरम्यान एकनाथ कदम यांची सुद्धा मेडिकल तपासणी केली जाणार आहे. रसायनी पोलिसांना या अपघाताची पहिल्यांदा माहिती मिळाली होती. एक्सप्रेसवर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झालं असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चालक कदम यांची सुद्धा चौकशी होणार आहे. आठ पथकाच्या देखरेखीत त्यांच्या अपघाताचा तपास होणार आहे.
हे ही वाचा:
अपघातावेळी विनायक मेटेंच्या हृदयाशी होता तिरंगा
“आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला”
स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या बातमीवर मला विश्वास बसला नाही. ते मराठा समाजासाठी सातत्याने लढा देत होते. त्यांनी अनेक आंदोलने देखील केली. मला ते तीन-चार दिवसांपूर्वीच भेटले होते. आज मराठा समाजासाठीची आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. सरकार त्यांच्या कुटुंबासोबत आहे. विनायक मेटेंच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची चौकशी केली जाईल. सर्व आरोपांची माहिती तपासली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.