कलाईसेल्वा आणि अर्जुनन यांनी मोनिकाचा डावा हात हातात घेतला आणि तिघांच्याही डोळ्यांतून अश्रु घळाघळा वाहू लागले. रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिकाला अर्जुनन यांच्या ब्रेन डेड मुलाचे हात जोडण्यात आले आहेत. आपल्या मुलाचा मोनिकाला देण्यात आलेला हात हातात घेतल्यानंतर आईवडिलांना भडभडून आले. जणू त्यालाच ते समोर पाहात होते. पण हाताच्या रूपात आपला मुलगा या जगात आहे, याचे एक समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर होते.
रेल्वे आणि प्लॅटफॉर्म यांच्या मधल्या जागेत पडल्यामुळे मुंबईतील मोनिका मोरे या तरुणीने सात वर्षांपूर्वी आपले दोन्ही हात गमावले होते. मोनिकाच्या हाताची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया २८ ऑगस्ट २०२० मध्ये परेलमधील ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली होती. शुक्रवारी मदुराई येथे राहणाऱ्या कलाइसेल्वा आणि त्यांचे पती अर्जुनन यांनी मोनिका मोरे हिची भेट घेतली. भेटीचे कारण होते, ते म्हणजे स्वतःच्या मुलाचे अस्तित्व मोनिकाला भेटून अनुभवायचे. बरोबर एक वर्षापूर्वी या दाम्पत्याने चेन्नईमधील ग्लोबल रुग्णालयात असलेल्या आपल्या ब्रेन डेड मुलाचे असेलन याचे हात दान करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईमधल्या या तरुणाच्या हातांनी मुंबईमधील मुलीला आयुष्यभरासाठी आधार दिला.
शुक्रवारी भेट झालेल्या या ‘तमिळ अम्मा’ आणि ‘मराठी मुलगी’ मध्ये कोणत्याही भाषेचे बंधन नव्हते. फक्त होती ती भावनिक मिठी आणि आनंदाचे अश्रू. माझ्या हाताकडे त्यांनी जेव्हा पाहिले तो क्षण खूपच भावनिक होता. माझेही पाय थरथरत होते. मी स्वतःला रोखूच शकले नाही आणि डोळ्यांतून अश्रू यायला सुरुवात झाली, असे मोनिकाने सांगितले. माझा मुलगाच माझ्या समोर बसला आहे असे वाटले, अशा भावनिक शब्दात अर्जुनन यांनी आपल्या भावना मोनिकाला भेटल्यावर व्यक्त केल्या. मोनिकाच्या शस्त्रक्रियेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने असेलनचा भाऊ अरुणविनन याने आपल्या आई वडिलांना मोनिकाशी भेट घालून द्यायला मुंबईला आणले होते. माझा भाऊ कोणत्यातरी रुपात समोर आहे, त्यामुळे मी आनंदी आहे, असे अरुणविननने सांगितले.
हे ही वाचा:
पॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या ‘योद्ध्या’ची कहाणी
कोरोनाचाचणीच्या प्रमाणपत्राचे गणेशभक्तांपुढे विघ्न
अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट
राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत
मोनिकाच्या हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १६ तास चालू होती. शिवाय ही शस्त्रक्रिया झाली तेव्हा कोरोनाचे संकटही होते. पण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. मोनिकाची शस्त्रक्रियेनंतरची प्रगतीही समाधानकारक आहे. काही महिन्यांनी मोनिका हाताने अवजड सामान उचलू शकेल, अशी माहिती डॉ. निलेश साथबाई यांनी दिली.
असेलनची स्वतःची एक आयटी कंपनी होती. त्याला क्रिकेटची आवड होती त्याचबरोबर त्याने काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. असेलनचे अजून सात अवयव दान करणार असल्याची माहिती अर्जुनन यांनी दिली. माझ्या मुलाने इतरांच्या रुपात अजून जगावं हीच इच्छा आहे. त्याचे बाकीचे अवयव हे शरीराच्या आतील असतील. मात्र मोनिकाला त्याचे हात दिले आहेत आणि आम्ही ते पाहू शकतो, असेही अर्जुनन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले. ते माझ्या रुपात त्यांच्या मुलाला पाहतात. पण अवयव दान व्हायला हवे. त्यामुळे अनेक जणांना आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळेल, असे मोनिकाने सांगितले.