राज्य सरकारने गोविंदा पथकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील गोविंदा पथकांनी स्वागत केले आहे.
राज्यातील गोविंदांसाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत त्यांना विमासंरक्षण दिले आहे. गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. सरकारची ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत राज्य सरकारने शासकीय आदेशांना मंजुरी दिली आहे. दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ७५ हजार गोविंदांना हे विमा संरक्षण मिळणार आहे.
विशेष म्हणजे, गतवर्षी राज्य सरकारने ५० हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. आता या गोविंदांची संख्या वाढवण्यात आली असून यावर्षी ७५ हजार गोविंदांना विमा कवच मिळणार आहे. गेल्या वर्षी गोविंदा आणि गोविंदा पथकांसंदर्भात राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी काही निर्णयांची आता राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत आहे.
प्रो-गोविंदा स्पर्धा ३१ ऑगस्टला
गेली अनेक वर्षे प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी यंदा पूर्ण होत आहे. ३१ ऑगस्ट रोजी वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी केली होती. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे.
हे ही वाचा:
सुनील राऊतांना पक्षात घ्यायला कोणी १०० रुपये पण देणार नाही
ममता बॅनर्जी, राहुल गांधींनंतर अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या
प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू
शिवाय दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना ७.५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.