जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी महिला अत्याचार, ट्रोलिंग, महिला सुरक्षा अशा विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्स वरून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी हा संदेश दिला आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या समाज माध्यमांवर चांगल्याच सक्रिय असतात. अनेकदा त्या सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. सोमवारी होत असलेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी रविवारी एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत महिला प्रश्नांवर आपले विचार व्यक्त केले आहेत.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
“महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षा, स्त्री सशक्तीकरण, स्त्री प्रगती याविषयी खूप काही बोलले जात आहे. पण एकीकडे हे बोलले जात असताना दुसरीकडे स्त्रियांवर होणारे अत्याचार तेवढेच वाढले आहेत. स्त्रियांवरचे बलात्कार, त्यांचे होणारे घाण ट्रोलिंग, त्यांच्या आत्महत्या या सुद्धा तेवढ्याच वाढल्या आहेत. मला तुम्हला एकच सांगायचे आहे की आपण महिलांविषयी काय बोलतो, त्यांच्याशी कसे वागतो यावर प्रत्येकाने विचार करावा. आज पुरोगामी महाराष्ट्रात या बदलाची गरज आहे.” असे अमृता फडणवीस यांनी आपल्या व्हिडीओ म्हटले आहे.
केवळ जीवन जगते आहे असे नाही,
तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे- ह्या विषयावर माझे काही विचार मांडते आणि ह्याच बाबत स्त्री शक्ति वर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की ऐका 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनी ! #InternationalWomensDay pic.twitter.com/qcNpdithzC— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 7, 2021
“प्रत्येक स्त्रिला वाटते की मी जिवंत आहे तर मी जिवंत का नाही दिसावे? माझ्या इच्छा, आकांक्षा का पुऱ्या करू नयेत? यात प्रत्यकाने स्त्रिला साथ दिली पाहिजे. तिला मागे खेचू नये.” असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
अमृता फडणवीस यांना स्वतःला अनेकदा सोशल मीडियावर अतिशय खालच्या दर्जाच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण त्यांनी स्त्रियांची बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.