महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हा कडक निर्बंधांचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार ९ मे पासून हे निर्बंध सुरू होतील.
देशात सध्या कोविडचे प्रमाण वाढले असुन त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला भसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत हे संक्रमण कमी करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पीएम केअर्समधून मिळालेले ६० व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून
कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका
धक्कादायक……!! कालव्यात सापडली शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शने!!
सरकारची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच
रविवार, ९ मे रोजी दुपारी सुरू होणारे हे कडक निर्बंध १५ मे पर्यंत लागू असणार आहेत. अमरावतीचे जिल्हाधीकारी शैलेश नवल यांच्या आदेशानुसार या कडक निर्बंधांच्या काळात किराणा दुकाने,दुध डेअरी, फळ-भाज्यांची दुकाने, बेकरी या गोष्टीही नागरिकांसाठी बंद असतील. पण सकाळी ११ पर्यंत घरपोच सेवा द्यायला परवानगी असणार आहे. या व्यतिरिक्त शाळा, काॅलेजेस, बागा, शिकवणी, सिनेमागृह, स्पा, ब्युटी पार्लर, मैदाने इत्यादी गोष्टी बंद राहणार आहेत.
या निर्बंधांतून सरकारी आणि खासगी इस्पितळे, रूग्णालये, औषध विक्रेते, प्राण्याचे दवाखाने यांना सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेशी निगडीत सरकारी आस्थापने वगळता इतर सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापने बंद असणार आहेत. पेट्रोल पंप सुरू राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवेतल्या गाड्यांनाच आणि वैध कारणासाठी बाहेर पडलेल्या गाड्यांनाच पेट्रोल देण्याची परवानगी असेल.
अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर आणि यवतमाळचे जिल्हाधीकारी अमोल येडगे यांनीही आपापल्या जिल्ह्यांसाठी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत.