मुंबई क्रिकेट संघटनेने मुंबईच्या सीनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून शैलीदार फलंदाज अमोल मुझुमदार यांची नियुक्ती केली आहे. जतीन परांजपे, विनोद कांबळी, नीलेश कुलकर्णी या क्रिकेट सुधारणा समितीने मुझुमदार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.
मुंबई रणजी संघाच्या या प्रशिक्षकपदासाठी ९ अर्ज आले होते. त्यातून अमोल मुझुमदार यांची निवड करण्यात आली. सुलक्षण कुलकर्णी, बलविंदर संधू, वासिम जाफर, साईराज बहुतुले, अमोल मुझुमदार, प्रदीप सुंदरम, उमेश पटवाल, नंदन फडणीस, विनोद राघवन या नऊ जणांनी या पदासाठी अर्ज केला होता.
हे ही वाचा:
तिने त्याला हनीट्रॅप मध्ये अडकवले; त्याने तिला संपवले
तुम्हीच आमचे माय बाप…अजूनही जनतेला फडणवीसांकडूनच अपेक्षा
मनसुख हिरेनप्रकरण भोवले; चौथा पोलीस अधिकारीही सेवेतून बडतर्फ
सेंट्रल विस्टा प्रकल्पात हेरिटेज इमारतींचे नुकसान होण्याचा प्रश्न नाही
याआधी, विजय हजारे वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईचे प्रशिक्षक असलेल्या रमेश पोवार यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षपदासाठी अर्ज केल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला होता. मुंबईच्या प्रशिक्षकपदावरून गेल्या काही महिन्यात बरेच वादविवाद झडले. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेवेळी अमित पागनीस यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्या स्पर्धेत मुंबईचा संघ प्राथमिक फेरीतच गारद झाला. त्यानंतर पागनिस यांनी राजीनामा दिला. नंतर रमेश पोवार यांची नियुक्ती विजय हजारे वनडे स्पर्धेपूर्वी करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने थेट स्पर्धेचे विजेतेपदच पटकाविले. या वर्षभरातील मुंबईचा हा तिसरा प्रशिक्षक ठरणार आहे.
४६ वर्षीय अमोल मुझुमदार यांनी १७१ प्रथम श्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून ११ हजार धावा त्यांच्या नावावर जमा आहेत. १९९३ ते २०१३ या २० वर्षांच्या कालावधीत ते क्रिकेट खेळले. राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.