भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ लवकरच यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. अमोल हे सोमवार, ३ जुलै रोजी क्रिकेट सल्लागार समितीसमोर मुलाखतीसाठी हजर झाले होते. या सल्लागार समितीचे सदस्य अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक हे अमोलच्या मुलाखतीमुळे समाधानी झाल्याचे चित्र होते.
अमोल मुझुमदार यांच्या मुलाखतीने सल्लागर समिती समाधानी दिसली. महिला संघाच्या भविष्यातील योजनांबाबत त्यांची स्पष्ट मते होती. अन्य सर्वांना त्यांनी केलेले सादरीकरणही पसंतीस उतरले. त्यांनी केलेले सादरीकरण इतरांच्या मानाने सर्वोत्कृष्ट होते. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांचीच निवड होईल, अशी आशा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी डरहमचे माजी प्रशिक्षक जॉन लुईस आणि तुषार अरोठे हेदेखील उत्सुक आहेत. आरोठे यांनी सन २०१८ मध्ये राजीनामा देण्याच्या आधी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही धुरा सांभाळली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रमेश पोवार यांना निलंबित करण्यात आल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद रिक्त आहे.
अमोल मुझुमदार हे मुंबईच्या रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघासोबतही काम केले आहे. ९ जुलैपासून बांग्लादेश दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय महिला संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. भारतीय महिलांचा संघ मीरपूरमध्ये तीन टी-२० सामने आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे.
हे ही वाचा:
इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार
भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?
उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी
खलिस्तानी समर्थकांकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग
अमोल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७१ सामन्यांतून ४८.१३ च्या सरासरीने ११ हजार १६७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३० शतके आहेत. ते रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत (९२०५) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुझुमदार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने सन २००६-०७मध्ये रणजी किताब जिंकला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.