आसाम सरकारचा ‘चौथा स्तंभ’

आसाम सरकारचा ‘चौथा स्तंभ’

आसाम राज्याने एक अभिनव प्रयोग करत पहिल्यावहिल्या सरकारी वृत्तपत्राची सुरुवात केली आहे. ‘असोम बार्ता’ अर्थात आसाम वार्ता असे या वृत्तपत्राचे नाव आहे. मंगळवार, १० मे रोजी या वृत्तपत्राच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा हे देखील उपस्थित होते.

आसाम सरकारची धोरणे, सरकारच्या योजना या संबंधीचे निर्णय, अंमलबजावणी संबंधीची माहिती अशा सर्व गोष्टी थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली आहे. हे एक मासिक स्वरूपाचे वृत्तपत्र असणार आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला या वृत्तपत्राची एक आवृत्ती प्रकाशित होईल. ज्यामध्ये राज्यातील सरकारी कामकाजाचा आढावा असणार आहे.

एकूण चार भाषांमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित होणार आहे. आसामी, इंग्रजी, हिंदी आणि बंगाली या चार भाषांमध्ये हे वृत्तपत्र उपलब्ध असणार आहे. तर प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपात हे वर्तमानपत्र जनतेपर्यंत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. यामुळे सरकार आणि जनता यांच्यात संवादाचा नवा सेतू निर्माण होणार आहे.

हे ही वाचा:

मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन

अल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

“राज्याच्या विकासाच्या प्रवासाची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आसाम सरकारने स्वतःचे वर्तमानपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे” असे राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितले. ८२८७९१२१५८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Assam’ असा संदेश पाठवून हे वर्तमानपत्र सबस्क्राईब करता येणार आहे.

Exit mobile version