अमित शहा करणार सहकार भारती लखनऊ राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

अमित शहा करणार सहकार भारती लखनऊ राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

सहकार भारतीचे सातवे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे होत असून या अधिवेशनाचे उद्घाटन १७ तारखेला सायं. ५.३०वाजता केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा, सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी व राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे दिली.

लखनऊ येथील फैजाबाद रोडवरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक परिसरात होणार्‍या अधिवेशनामध्ये देशभरातून सहकार भारतीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते तर महाराष्ट्रातून सुमारे एक हजार कार्यकर्ते या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये श्रध्देय लक्ष्मणराव इनामदार स्मृती पुरस्कार कर्नाटकातील कॅम्प्को या सहकारी संस्थेस रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते १८ तारखेला दुपारी १२.३० वाजता प्रदान केला जाणार असून तो कॅम्प्कोचे अध्यक्ष किशोरकुमार कोडगी स्विकारणार आहेत. प्रामुख्याने चॉकलेट, सुपारी आणि रबर यापासून विविध पदार्थ, वस्तू बनवणार्‍या कॅम्प्को सहकारी संस्थेने ग्रामीण कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

या अधिवेशनामध्ये सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असून केंद्र सरकारकडे मांडावयाच्या विविध प्रस्तावांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य, महामंत्री डॉ. उदय जोशी, संघटनमंत्री संजय पाचपोर, नॅफकॅबचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे तसेच सहकार क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार असून सहकाराला नवी दिशा देण्याचे मोलाचे कार्य या अधिवेशनात होणार आहे.

हे ही वाचा:

मिस युनिव्हर्स हरनाजला मिळणार या उत्तमोत्तम सुविधा आणि घसघशीत कमाई!

सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला

एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

आमचा उमेदवार गरीब होता; नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण

 

या अधिवेशनात सहकार मेळा भरवला जाणार असून त्यामध्ये सहकार क्षेत्रातील यशोगाथेवरील प्रदर्शनाचे त्याचप्रमाणे सहकाराच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसहायता गटाने तयार केलेले आणि स्वदेशी उत्पादने उपलब्ध असणार आहेत. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड केली जाणार असून विविध विषयांवरील ठराव पारित केले जाणार आहेत.

‘बिना संस्कार नहीं सहकार’ हे ब्रीद घेऊन १९७८ ला स्थापन झालेल्या सहकार भारतीची राष्ट्रीय अधिवेशने यापूर्वी २००३ मध्ये मुंबई (महाराष्ट्र), २००६मध्ये दिल्ली, २००९ मध्ये भोपाळ (मध्यप्रदेश), २०१३ मध्ये बेंगळूर (कर्नाटक), २०१५ मध्ये अहमदाबाद (गुजरात), २०१८ मध्ये पुष्कर (राजस्थान) येथे संपन्न झाली आहेत.

Exit mobile version