राज्यसभेत संविधानावर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बी.आर.आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष सातत्याने मंत्री शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही सभागृहात राज्यघटनेच्या गौरवगाथेवर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. संसदेत जेव्हा चर्चा होते तेव्हा एक गोष्ट कॉमन असते की वस्तुस्थितीवर चर्चा व्हायला हवी. पण कालपासून काँग्रेस वस्तुस्थितीचा विपर्यास करत असल्याचे त्यांनी म्हटले.
संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण करत काँग्रेसवर टीका केली. मात्र, गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने विपर्यास केला आणि तेवढ्याच वक्तव्याचा व्हिडीओ कापून भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. यावरून पत्रकार परिषद घेत गृहमंत्री शाह म्हणाले, काँग्रेसने वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत निंदनीय आहे, याचा निषेध करतो.
काँग्रेस आणि भाजपच्या सरकारच्या काळात भारताच्या संविधानाचे मूल्यमापन, संरक्षण कोणी कसे केले, याचे संदर्भासहित स्पष्टीकरण भाजपाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण आणि संविधान विरोधी आहे हे स्पष्ट झाले आहे. वीर सावरकरांचा अपमान देखील काँग्रेस पक्षाने केला, आणीबाणी लागू करून संविधानाचा अपमान केला, न्याय पालिका, सेनेतील हुतात्म्यांचा अपमान केला. जेव्हा हे सत्य उघड झाले तेव्हा काँग्रेसने आपल्या जुन्या पद्धतीचा वापर करत वक्तव्याला तोडून-मोडून त्याला सत्य-असत्याचे कपडे घालून समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला.
संसदेत चर्चा सुरु असताना काँग्रेसने बाबासाहेबांचा कसा विरोध केला हे समोर स्पष्ट झाले. काँग्रेसने बाबा साहेबांच्या मृत्युनंतरही त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वतःला भारतरत्न दिला आहे. १९५५ साली नेहरूंनी स्वतःला भारतरत्न दिला होता, १९७१ ला इंदिरा गांधी आणि बाबा साहेबांना १९९० रोजी भारतरत्न मिळाला. बाबा साहेबांना भारतरत्न मिळाला तेव्हा काँग्रेसची सत्ता नव्हती तर तेव्हा भाजपा समर्थित सरकार होती. नेहरूंचा आंबेडकरांबद्दलचा द्वेष जगजाहीर आहे, असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले.
‘सर्वपक्षीय मंत्रिमंडळ हे देशातील पहिले मंत्रिमंडळ बनले ज्यामध्ये बाबा साहेब आंबेडकरही सदस्य होते, नेहरूजी पंतप्रधान होते. नेहरूजींच्या ‘सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू’ या पुस्तकात आणखी एक उल्लेख येतो. नेहरूंच्या आश्वासनानंतरही भीमराव आंबेडकरांना कोणतेही महत्त्वाचे खाते देण्यात आले नाही. जोपर्यंत काँग्रेसची सत्ता होती तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे एकही स्मारक बांधले नाही. जिथे जिथे विरोधी सरकार आले तिथे तिथे स्मारके बांधली गेली.
हे ही वाचा :
गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली, तीन मृत्युमुखी, कशी घडली दुर्घटना?
फरार विजय मल्ल्याची मालमत्ता विकून १४ हजार कोटी केले वसूल!
सत्तेच्या उबेत असलेले रिकाम्या हातांचे मुके घेतील कशाला?
भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित पंचतीर्थ विकसित केले, मध्य प्रदेशातील महू, लंडनमधील डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, नागपुरातील दीक्षाभूमी, दिल्लीतील राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील चैत्रभूमीचा विकास करण्याचे काम भाजप सरकारने केले. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी पंतप्रधान मोदींनी आंबेडकरांच्या सन्मानार्थ ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला.
ते पुढे म्हणाले, राज्यसभेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधाने संपादित करून सार्वजनिक केली होती. निवडणुका सुरू असताना माझे विधान एआय वापरून संपादित करण्यात आले. आणि आज ते माझ्या विधानाचा विपर्यास करत आहेत. मी मीडियालाही विनंती करू इच्छितो की माझे संपूर्ण विधान लोकांसमोर ठेवावे. मी त्या पक्षाचा आहे जो कधीही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही. प्रथम जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाने नेहमीच आंबेडकरांच्या तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा-जेव्हा सत्तेत होता तेव्हा आंबेडकरांच्या तत्त्वांचा प्रचार-प्रसार केला. भारतीय जनता पक्षाने आरक्षण मजबूत करण्याचे काम केले आहे.
केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, मला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही सांगायचे आहे की, तुम्ही काँग्रेसच्या या दुष्ट प्रयत्नाला पाठिंबा देऊ नये. राहुल गांधींच्या दबावाखाली तुम्हीही यात सामील झाला आहात याबद्दल मला खूप वाईट वाटत असल्याचे गृहमंत्री शाह यांनी म्हटले.