फ्लोरिडाला जाणारे अमेरिकेचे विमान हवेच्या दाबामुळे अवघ्या तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली आले. त्यामुळे या विमानात बसलेल्या प्रवाशांची भीतीने गाळण उडाली होती.
या विमानाने नॉर्थ कॅरोलिनामधील शार्लोट येथून उड्डाण केले आणि ते फ्लोरिडा येथील गेनेसविले येथे जात होते. अमेरिकन एअरलाइन्सच्या ५९१६ या विमानाने १० ऑगस्ट रोजी शार्लोट येथून उड्डाण केले. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांना हवेच्या दाबाची समस्या जाणवली. त्यामुळे विमान कर्मचाऱ्यांनी तशी सूचना प्रवाशांना दिली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत हे विमान १५ हजार फूट खाली आणले गेले. या विमानातून प्रवास करणारे एक प्रवासी हॅरिसन होव्ह यांनी स्वत:चे ऑक्सिजन मास्क घातलेले छायाचित्र शेअर करत या घटनेला ‘भयानक’ असे म्हटले आहे.
‘मी अनेकदा विमानोड्डाणे केली आहेत. मात्र हा अनुभव धडकी भरवणारा होता. अमेरिकन एअर ५९१६ वरील आमच्या फ्लाइट क्रू-केबिन स्टाफ आणि वैमानिकांचे अभिनंदन. जळण्याचा वास किंवा मोठा आवाज छायाचित्रात जाणवू शकत नाही,’ असे फ्लोरिडा विद्यापीठाचे प्राध्यापक हॉव्ह यांनी लिहिले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा अपघात घडूनही हे विमान फ्लोरिडामधील गेनेसविले प्रादेशिक विमानतळावर संध्याकाळी पाच वाजण्याच्या आधी (स्थानिक वेळेनुसार) उतरले.
हे ही वाचा:
लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळ भाषण करण्याचे रेकोर्ड नरेंद्र मोदींच्याचं नावे
वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज
‘हवेच्या दाबाच्या समस्येमुळे अचानक विमानाला कमी उंचीवरून उड्डाण करावे लागते,’ असे अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने वृत्तवाहिनीला सांगितले. विमानामधील कर्मचाऱ्यांना संभाव्य दबावाच्या समस्येबाबत संकेत मिळाले. त्यामुळे त्यांनी विमान ताबडतोब आणि सुरक्षितपणे कमी उंचीवर नेले. कोणतीही गैरसोय झाली असल्यास आम्ही आमच्या ग्राहकांची माफी मागतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल आमच्या टीमचे आभार मानतो,’ असे या प्रवक्त्याने जाहीर पत्रकात नमूद केले आहे.