सध्या संपूर्ण देशभरातच लसींच्या तुटवड्यावरून राजकारण रंगत आहे. या दरम्यान भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या आदर पुनावाला यांच्याकडून लसींबाबतची एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कोविशिल्डच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल अमेरिका-युरोपने रोखला असल्याचा खळबळजनक खुलासा पुनावाला यांनी केला आहे.
हे ही वचा:
कोरोना लसींचा काळाबाजार होतोय का?
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही धक्कादायक गोष्ट उघड केली होती. एसआयआयच्या उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले होते. “मला इच्छा आहे, स्वतः अमेरिकेला जावं आणि निषेध व्यक्त करून सांगावं की, तुम्ही भारत आणि जगातील इतर अनेक लस उत्पादकांसाठी कोवॅक्सिन आणि इतर लसींच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मलाचा पुरवठा रोखून धरत आहात.”
“सध्या तात्पुरत्या काळासाठी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे हे एकमेव कारण आहे. साधारणपणे वर्षभरानंतर किंवा सहा महिन्यांनंतर आपल्याला या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही, कारण आम्ही दुसरे पुरवठादार शोधून काढू.”
गुणवत्ता आणि इतर काही कारणांमुळे एसआयआय चीनच्या पुरवठादारांकडून हा कच्चा माल घेत नाही. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सिरम इन्स्टिट्युट सध्या महिन्याला सहा- साडे सहा कोटी कोविशिल्ड लसींचं उत्पादन करत आहे. हे उत्पादन वाढवून महिन्याला १०-११ कोटी करण्याचे लक्ष्य आहे असेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमध्ये ऑक्स्फर्ड आणि ऍस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. सध्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस देण्यात येत आहे.