दादरच्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्मारकाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. बाबाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सर्वाना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येईल. ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक डेडलाईन आधीच पूर्ण होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की डॉ. बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी सर्वांचीच ईच्छा आहे. ४५० फुटाचा भव्य पुतळा उभारण्यात येईल. लेक्चर हॉल, ऑडिटोरियम वाहनतळ तयार झाला आहे.जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालं आहे. वेगानं ही काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक डेडलाईन आधीच पूर्ण होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
स्मारकाची बाकी कामं प्रगतीपथावर आहे. त्याचा बेस तयार आहे. हे स्मारक व्हावं यावर चर्चा झाली. सर्वसमावेशक समितीने गाझियाबादमधला पुतळा पाहिला. त्याला अंतिम मंजुरी दिल्यावर तातडीने कार्यवाही होईल. कुठे काही अडचण येणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मार्च २०२४ ची तारीख आहे. पण त्यापूर्वी स्मारक व्हावे हा प्रयत्न आहे. बाबासाहेब सर्वांचे होते. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचं ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन पाहिलं. त्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी १५ मिनिटं चर्चा केली. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेतल्यावर राजकीय वर्तुळात या भेटीचं चर्चा सुरु झाली. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीमागे कोणतंही राजकारण नाही. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. बाबासाहेबांची वास्तू पाहणं हाच भेटीचा हेतू होता. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा :
क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे
हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स
शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत पूर्तता
स्मारक तयार करताना त्याकाळामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री असताना कायदा करून ही जागा हस्तांतरित केली. एमएमआरडीएतून त्यावेळी मान्यता दिली. निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्या विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे आली. त्यांनी निधी उपलब्ध करून देऊन त्या कामाला गती दिली. ते मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री असतानाच स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.