एखाद्या दुकानात गेल्यावर मोबाईलने ऑनलाइन पैसे भरणे हे आता नित्याचे झाले आहे. पण हाताचा तळवा दाखवून पैसे भरता येतात हे नवेच तंत्र आता येऊ घातले आहे.
ऍमेझॉनने नवीन ‘पाम रेकिग्नेशन’ तंत्रज्ञान सादर केले आहे, ज्याद्वारे या तंत्रज्ञानाचा वापर करणारे हाताचा तळवा दाखवून पैसे भरू शकतील. या नव्या तंत्रज्ञानामुळे आता पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज भासणार नाही. या नव्या तंत्रज्ञानाला ‘ऍमेझॉन वन’ असे नाव देण्यात आले आहे. या तंत्रात रिटेल स्टोअरमध्ये दूरवरून हात दाखवून पैसे भरता येतात. रेड रॉक्समार्फत डेनवरमध्ये हे तंत्रज्ञान सुरू केले असून लवकरच इतर ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. ऍमेझॉनच्या वतीने सुमारे एक वर्षापासून ‘पाम रेकिग्नेशन टेक्नॉलॉजी’ वर काम चालू होते. या सेवेसाठी कंपनीने पेटंटसाठी अर्ज केला आहे.
‘ऍमेझॉन वन’ ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकाकडे ऍमेझॉनचे खाते असण्याची आवश्यकता नाही. ग्राहक त्यांच्या फोन नंबर आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने ही सेवा वापरू शकतील. हॅकिंग आणि सायबर गुन्हे लक्षात घेता गोपनीयता तज्ज्ञांनी ऍमेझॉनला यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र या तंत्रज्ञानासाठी लागणारी ग्राहकांची माहिती क्लाऊडवर सुरक्षित ठेवली जाणार आहे. तसेच वापरकर्ते त्यांची माहिती कधीही काढून टाकू शकतात, असे ऍमेझॉनकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
बीकेसी पूल दुर्घटनेसंबंधी कंत्राटदारावर अखेर गुन्हा
‘सोमैय्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई बेकायदेशीर’
पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत
ऍमेझॉनने एईजी या मनोरंजन क्षेत्रातील कंपनीशी हे तंत्रज्ञान वापरासाठी करार केला असून लवकरच हे तंत्रज्ञान वापरात येईल. ‘ऍमेझॉन वन’ हा हाताच्या तळव्याचा वापर ग्राहकाची ओळख म्हणून करेल. या तंत्रात हाताच्या पृष्ठभागाचे तपशील आणि रेषाद्वारे एक ‘पाम’ स्वाक्षरी तयार केली जाईल. ‘पाम’ स्वाक्षरी सुरुवातीला ऍमेझॉनच्या स्वतःच्या गो स्टोअरमध्ये वापरली जाईल. तसेच, कंपनी येत्या वर्षात ‘ऍमेझॉन वन’ला इतर स्टोअरशी जोडेल.