आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक झाली नसून चौकशीनंतर ईडीने सोडून दिले आहे.ईडीने कथित वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यात ‘आप’चे आमदार अमानतुल्लाह खान यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली होती.मात्र, अटकेची बातमी खोटी असून आमदार खान यांची चौकशीनंतर ईडीने सोडून दिले आहे.ईडीने त्यांना दिल्ली वक्फ बोर्डातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.अनेक तासांच्या चौकशीनंतर अमानतुल्ला यांना गुरवारी(१८ एप्रिल) रात्री उशिरा ईडीने सोडून दिले.
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, ईडीसमोर सादर झाले होते. ईडीने खान यांची तब्बल १० तास चौकशी केली आणि त्यांचे जबाबही नोंदवले.तर, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी ‘एक्स’वर केंद्र सरकार ‘ऑपरेशन लोटस’वर काम करत असल्याचा आरोप केला. ‘मंत्री, आमदारांवर बनावट गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जात आहे. अमानतुल्लाह यांच्या विरोधात ईडीकडून निरर्थक गुन्हे दाखल केले जात आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा:
चीनच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी!
हेलिकॉप्टर दुर्घटनेत केनियाच्या संरक्षणप्रमुखासह नऊ जणांचा मृत्यू!
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात १०२ मतदारसंघात मतदान
मध्य पूर्व आशियात युद्ध भडकणार? इराणच्या शहरांवर इस्रायलकडून क्षेपणास्त्र हल्ला
काय आहेत आरोप?
खान यांनी दिल्ली वक्फ बोर्डात कर्मचाऱ्यांच्या अवैध भर्तीच्या माध्यमातून मोठी रक्कम रोखीत मिळवली आणि आपल्या सहकाऱ्यांच्या नावे दिल्लीत विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी हे पैसे गुंतवले, असा ईडीचा दावा आहे. वक्फ बोर्डात कर्मचाऱ्यांची अवैध भरती झाली. खान यांच्या अध्यक्षतेखाली (२०१८-२०२२) वक्फ बोर्डाच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने भाडेपट्ट्यावर देऊन खान यांनी अवैधपणे लाभ घेतला. खान यांच्या मालमत्तेवर छापे टाकले असता अनेक गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे.
खान यांचा खुलासा
ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी खान यांनी पत्रकारांशी बोलताना आपली बाजू मांडली. जेव्हा ते वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी नियमांचे पालन केले. तसेच, कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आणि सन २०१३मध्ये आलेल्या नव्या नियमानुसार काम केले, असा दावा त्यांनी केला. सीबीआयने केलेल्या प्राथमिक आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या तीन तक्रारींशी संबंधित मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.