जुलैच्या मध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला. या मुसळधार पाऊस आणि नंतर आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसानीचा सामना सर्वसामान्य नागरीक करत आहेत.
२२ आणि २३ जुलैला आलेल्या महाप्रलयाचा पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला. अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ आणि ढगफुटी अशा नैसर्गिक आपत्तींना कोकणातील जिल्हे सलग तीन वर्षे तोंड देत आहेत.
यंदाच्या ढगफुटीमुळे मुंबईसह उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे १९७ नागरिकांचा बळी गेला. आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये ५३१०.७८ हेक्टर शेती पीक आणि फळांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हे ही वाचा:
थुंकणाऱ्यांवर सर्वाधिक दंड आकारला आहे कुर्ल्यात
देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा
शॉपिंग मॉल विक्रेत्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चार जिल्ह्यांतील जवळपास १२१० गावांना महापुराचा फटका बसला असून सर्वात जास्त म्हणजेच ४८२ गावे ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. तसेच पालघरमधील ३९६ गावे, रायगडमधील २८५ गावे आणि सिंधुदुर्गमधील ४७ गावे पाण्याखाली गेली होती. यंदाच्या महापुरात रस्ते, गावे, शेती, घरे जनावरे वाहून गेली तर काही ठिकाणी गावेच्या गावे गाडली गेली. गावातील घरे, शाळा, शासकीय इमारतींची पडझड झाली आहे. अनेक गावांमध्ये विजेचे खांब कोसळले आहेत तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आता राज्य सरकारने घोषित केलेल्या अर्थसहाय्याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून आहे.
सर्व जिल्हा यंत्रणेने युध्दपातळीवर नुकसानीचे पंचनामे करावेत असे आदेश कोकण आयुक्त विलास पाटील यांनी दिले आहेत.