नऊ महिन्यांत १४६ वाघांचा मृत्यू; गेल्या ११ महिन्यांतील सर्वाधिक संख्या

वाघांच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशी दोन्ही आहेत.

नऊ महिन्यांत १४६ वाघांचा मृत्यू; गेल्या ११ महिन्यांतील सर्वाधिक संख्या

यंदाच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत भारतातील सुमारे १४६ वाघांचा मृत्यू झाला असल्याचे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. सन २०१२पासूनची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे भारताच्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला धक्का बसला आहे. तसेच, www.tigernet.nic.in या वेबसाइटवरील माहितीनुसार, वाघाच्या अवशेषाच्या तस्करीतही वाढ झाली आहे. या वर्षी या प्रकरणी सर्वाधिक १४ गुन्हे दाखल झाले आहेत. ही संख्याही सन २०१७पासूनची सर्वाधिक आहे.

 

सर्वाधिक वाघांचे मृत्यू मध्य प्रदेशमध्ये (३४) नोंदवले असून त्यानंतर महाराष्ट्राचा (३२) क्रमांक लागतो. सुमारे १४६ वाघांपैकी २४ हे बछडे होते. त्यामुळे याचा विपरित परिणाम वाघांच्या संख्येवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तराखंडमधील सुमारे १७ वाघांचा, तर आसाममधील सुमारे ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर, कर्नाटकमधील नऊ आणि राजस्थानमधील पाच वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या कालावधीत देशातील विविध व्याघ्र संरक्षण वनांमध्ये ७० व्याघ्रमृत्यूंची नोंद झाली आहे.

 

 

सन २०२२मध्ये १२१ व्याघ्रमृत्यू झाले होते. तर, २०२१मध्ये १२७, २०२०मध्ये १०६, २०१९मध्ये ९६, २०१७मध्ये ११७, २०१६मध्ये १२१, २०१५मध्ये ८२, २०१४मध्ये ७८, २०१३मध्ये ६८ आणि २०१२मध्ये ८८ व्याघ्रमृत्यूंची नोंद झाली होती.
राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणानुसार, या वाघांचे मृत्यूचे कारण नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशी दोन्ही आहेत. अनैसर्गिक मृत्यूंमध्ये अपघात, वाघांमधील संघर्ष यांचा समावेश होतो. तर, शिकारीच्या कारणाचा उल्लेख स्वतंत्रपणे केला जातो. ‘यंदाच्या वर्षी वाघांच्या शिकारीत वाढ झाली आहे. वाघाची कातडी आणि नखे मिळवण्यासाठी वाघांना अनेकदा विषही दिले जाते. अशा काही घटनांची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे,’ असे कर्नाटकच्या वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आणि युनायटेड कन्झर्व्हेशन मुव्हमेंटचे माजी सदस्य जोसेफ हूवर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्राकडे तीन वर्षांसाठी येणार!

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

 

‘बोरिवलीमध्ये राबवण्यात आलेल्या एका मोहिमेत वाघांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या तिघांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात कर्नाटकमधूनही एकाला आम्ही अटक केली होती. तसेच, त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीचे वाघांच्या कातड्या आणि वाघनखे आढळली होती,’ अशी माहिती एमएचबी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली.

 

 

‘आफ्रिकेमधून चित्ते आणण्यासाठी जो पैसा खर्च करण्यात आला तो वनविभाग बळकट करण्यासाठी वापरण्यात आला असता तर अशा प्रकारचे मृत्यू रोखता आले असते,’ असे अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनच्या संचालिका सरिता सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

Exit mobile version