भाजपाने आंदोलनाद्वारे दिला इशारा
मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी खुली नसल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर येत असलेला ताण, सर्वसामान्यांच्या प्रवासाची होत असलेली गैरसोय हे सर्व आता असह्य होत असल्यामुळे ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले असतील त्यांना लोकल रेल्वे खुली करा, अशी मागणी शनिवारी भाजपाच्या वतीने करण्यात आली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली स्टेशनबाहेर हे आंदोलन करण्यात आले. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, मनिषाताई चौधरी आदिंचाही या आंदोलनात सहभाग होता.
यावेळी हजारो प्रवाशांनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला की, दोन लसीकरण झालेल्यांना तात्काळ रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा प्रवाशांचे उग्र आंदोलन उभे राहील.
ते म्हणाले की, लोकांना आज नोकरीला जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय हवा आहे. जर सर्वसामान्य नोकरीला गेले नाहीत तर त्यांनी घर कसे चालवायचे, मुलांची फी कशी भरायची. त्यामुळे सर्वसामान्यांचा तळतळाट नको असेल तर लसीकरण झालेल्यांसाठी रेल्वे खुली करा. प्रथम आम्ही विनंती करतो आहोत. टोकाचे आंदोलन करावे लागले तरी त्याची पर्वा नाही. रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री सुदैवाने महाराष्ट्राचे आहेत. शासनाने प्रस्ताव पाठवावा मी मान्यता देतो असे दानवेंनी सांगितले आहे. पण तुम्ही प्रवासी तुमची जबाबदारी अशी ठाकरे सरकारची भूमिका आहे. रेल्वे प्रवासाविषयीच्या निर्णयाला आपण विलंब लावू नका. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
उद्या जरी रेल्वे बंद कराव्या लागल्या आणि सरकारला ठप्प करावे लागले तरी आम्ही ते करणार आहोत, असा इशाराही दरेकर यांनी दिला.