गेली अनेक वर्षे रखडलेले चिपी विमानतळ आता लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. राज्यातील कोकण विभाग आता देशाशी हवाई मार्गाने जोडता येणार आहे.
९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल. अलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू करेल. अलायन्स एअरचे प्रादेशिक समन्वयक अली अब्बास आबिदी म्हणाले की, यामुळे महाराष्ट्राचा कोकण प्रदेश भारताच्या हवाई नकाशावर येऊ शकेल.
अलायन्स एअरचे विमान मुंबईहून सकाळी ११.५५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १.३५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर पोहचेल. परतीचे विमान सिंधुदुर्ग येथून दुपारी १.२५ वाजता सुटेल आणि मुंबईला २.५० वाजता पोहचेल. मुंबई- सिंधुदुर्ग विमानप्रवासाठी दोन हजार ५२० रुपये मोजावे लागतील आणि सिंधुदुर्ग- मुंबई प्रवासासाठी दोन हजार ६२१ रुपये प्रवाशांना मोजावे लागतील.
हे ही वाचा:
सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?
पंजाबनंतर हरियाणामध्ये काँग्रेसवर संकट
भारताच्या ‘वॅक्सिन’ मुत्सद्देगिरीला यश
सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. येथील विमानसेवा सुरू झाल्यामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती आबिदी यांनी दिली. सध्या, रस्त्याने मुंबईहून सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी साडेनऊ तास लागतात, तर हे अंतर विमानाने फक्त १ तास २५ मिनिटात पूर्ण केले जाईल. अलायन्स एअर मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत रोज थेट विमान सेवा सुरू करेल या शहरांमधील विमान सेवेसाठी अलायन्स एअर आपले ७० आसनी एटीआर (ATR) ७२-६०० विमान तैनात करेल अशी माहिती देण्यात आली आहे.