गाय हा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेतो आणि सोडतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास असल्याची टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टानं बुधवारी एका प्रकरणात केली आहे. गाईच्या दुधापासून तयार केलेले पंचगव्य, त्यातून तयार केलेले दही, तूप, मूत्र आणि शेण हे अनेक असाध्य रोगांवर गुणकारी ठरतात, असं देखील कोर्टाच्या वतीनं म्हटलं गेलं. न्यायमूर्ती शेखऱ कुमार यादव यांनी याचिकाकर्ता जावेदचा जामीन फेटाळताना हे भाष्य केलं. तक्रारकर्त्या खिलेंद्र सिंहची गाय चोरून त्याची हत्या केल्याचा जावेद आणि इतर सहकाऱ्यांवर आरोप आहे.
न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, “हिंदू धर्मानुसार गायीमध्ये ३३ देवतांचे वास्तव्य असल्याचं मानलं जातं. ऋग्वेदात गायीला अघन्या, यजुर्वेदात गायीला गौर अनुपमेय आणि अथर्ववेदात संपत्तीचं घर म्हटलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना सर्व ज्ञान गायींकडून मिळालं असल्याचा उल्लेख करण्यात आला.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते की तुम्ही मला मारले तरी गाईवर हात उगारू नका. पंडित मदन मोहन मालवीय यांनी संपूर्ण गोहत्या बंदीची बाजू मांडली होती. भगवान बुद्धांनी गायीला माणसाचा मित्र म्हणून वर्णन केले आहे. तर जैन लोकांनी गायीला स्वर्ग म्हटले आहे.”,अशी भूमिका न्यायालयानं मांडली आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात पुन्हा उमलणार कमळ, काँग्रेस गमावणार पंजाबची सत्ता
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
न्यायालयाने म्हटले की, “भारतीय राज्यघटना तयार करताना, संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी मूलभूत अधिकार म्हणून गोरक्षणाच्या समावेशाबद्दल बाजू मांडली होती. हिंदू शतकानुशतके गायीची पूजा करत आहेत. इतर धर्मीय देखील या भावनेचा आदर करत आलेले आहेत..यामुळं मुघल काळात गोहत्येला इतर धर्मीय नेत्यांनी कडाडून विरोध केला होता”, अशी टिप्पणी करण्यात आलीय.