महाराष्ट्रातील वाडा येथील ‘वाडा कोलम’ या तांदळाला नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले असताना आता अजून एका महाराष्ट्रातील उत्पादनाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.
अलिबागमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून उत्पादन होत असलेल्या पांढऱ्या कांद्याला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून तोंडी स्वीकृती देण्यात आली आहे. या मानांकनामुळे पांढऱ्या कांद्याला देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे सोपे होणार आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या विविध काद्यांपैकी एक अलिबागच्या कांद्याला हल्ली ग्राहकांकडून पसंती मिळू लागली आहे. अलिबाग तालुक्यात लागवडीखाली क्षेत्र १४ ते १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र २२० ते २३० हेक्टर इतके आहे. ‘बॉम्बे प्रेसिडेन्स- कुलाबा’ गॅझेटच्या १८८३ च्या मूळ प्रतीत आणि २००६ च्या ई- आवृत्ती मध्ये पांढरा कांदा लागवडीखाली असल्याचे काही ऐतिहासिक संदर्भ देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
अवजड वाहनाच्या मालकांवर गुन्हे दाखल करणे अवघड?
ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!
निर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..
मोदी सरकारच्या काळात संरक्षण सिद्धतेला मोठे बळ
येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या वाडवडिलांच्या आधीपासूनच्या कांद्याच्या शुद्ध बियाणांचे संवर्धन केलेले आहे. येथील सात- आठ गावे पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून उत्पादकांची संख्या सहाशेहून अधिक आहे. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रायगड, कृषी विभाग व पुणे येथील ‘जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख गणेश हिंगमिरे यांनी सामंजस्य करार केला होता. त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे १५ जानेवारी २०१९ ला पांढऱ्या कांद्याची ‘जीआय’साठी नोंदणी झाली. अलिबाग कांदा संघही स्थापन करण्यात आला आहे.
पांढऱ्या कांद्याची ओळख म्हणजे रंगाने पांढरा शुभ्र, चवीला थोडा गोडूस, आकर्षक आकार आणि विविध औषधी गुणधर्म.