राज्याच्या सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लसीकरण झालेल्या लोकांची टक्केवारी खूपच कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेत सर्व दारू विक्रेत्यांना केवळ लसीकरण किंवा किमान लसीचा एक डोस झालेल्या ग्राहकांना दारू विकण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास दारूची दुकाने सील करण्यास उत्पादन शुल्क विभागाला सांगण्यात आले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि आयपीसीच्या योग्य कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण न झालेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील लसीकरण झालेल्या लोकांची टक्केवारी खूपच कमी असल्याने हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रात, किमान ७४ टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे, परंतु बीडसाठी हा आकडा ५५ टक्के आहे.
हे ही वाचा:
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
‘२६/११ चा हल्ला हा मानवतेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता’
भूकंपाच्या झटक्यांनी पूर्व, ईशान्य भारत हादरला
छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती
बीडच्या जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी २१ नोव्हेंबर रोजी “नो व्हॅक्सिन, नो एंट्री” असा आदेश जारी केला आहे. हा आदेश जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या प्रमुखांना पाठवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील प्रवेशाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला. बीडमध्ये येणाऱ्या लोकांच्या लसीकरणाबद्दल माहिती तपासण्यासाठी पोलीस वाहने थांबवत होते. तसेच ज्या नागरिकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, त्यांचे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभाग आणि पालिका अधिकारी जागेवरच लसीकरण करत होते. यासाठी विशेष व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.
आदेशात सर्व दुकानदार, कारखानदार, आस्थापने यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे की नाही याकडे लक्ष देण्यास सांगितले असून लसीकरण झाले नसल्यास जवळील लसीकरण केंद्राशी संपर्क करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून कर्मचार्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येईल.