हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार याला मातृशोक झाला आहे. बुधवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत सोशल मिडीया हँडलवरून ही माहिती दिली असून ‘आज मी असह्य वेदना सहन करत आहे’ असे अक्षयने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ३ सप्टेंबर रोजी मुंबई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवले गेले होते. अक्षय कुमार लंडन येथे ‘सिंड्रेला’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. पण आईची प्रकृती चिंताजनक आहे हे कळल्यावर त्याने तातडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. सोमवारी अक्षय आपल्या आईसोबत थांबण्यासाठी मुंबई येथे दाखल झाला.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार
संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री
शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?
आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!
मंगळवार सात सप्टेंबर रोजी अक्षयने त्याच्या आईच्या प्रकृती विषयी सोशल मीडियावरून माहिती दिली. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. आपल्यापैकी प्रत्येकाची प्रार्थना सहाय्यक असेल.’ असे अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर ८ सप्टेंबर रोजी अक्षयने त्याच्या आईच्या निधनाचे वृत्त दिले. ‘माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी शांततेत या जगाचा निरोप घेतला आहे आणि परलोकात माझ्या वडिलांपाशी गेली आहे. मी आणि माझे कुटुंब या कठीण काळातून जात असताना आपण सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना केली त्याचा मी आदर करतो.’ असे अक्षयने म्हटले आहे.