शरद पवारांवर ‘फुली’; आता यशवंतरावांच्या वाटेवर अजितदादा

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आपलं राजकारण चालणार असल्याचा अजित पवार यांच्याकडून संदेश

शरद पवारांवर ‘फुली’; आता यशवंतरावांच्या वाटेवर अजितदादा

राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार हे आपल्या समर्थक आमदार तसंच कार्यकर्त्यांसह बाहेर पडले आणि राज्यातील भाजपा शिवसेना युतीच्या सरकारला त्यांनी समर्थन दिले. अर्थात अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या दिग्गज नेत्यांना शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थानही दिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुरू असताना दुसरीकडे अजित पवार समर्थकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये लावण्यात येणाऱ्या पोस्टर्सवर स्व. यशवंतराव चव्हाण यांचे फोटो झळकू लागले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि एक सुसंस्कृत नेते अशी प्रतिमा असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आपलं राजकारण समाजकारण, चालणार असल्याचा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे दिला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील प्रमुख नेते शरद पवार हेच आपले दैवत आहेत.. असं वारंवार सांगत होते. पण एकीकडं पक्षातून बाहेर पडायचं, पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि दुसरीकड शरद पवार यांचा फोटो पोस्टर्सवर वापरायचा हा प्रकार काही शरद पवार गटाला मान्य नव्हता. त्यामुळे जाहीरपणे शरद पवारांचा फोटो अजित पवार समर्थकांनी पोस्टर्स वर वापरू नये, अस आवाहन करण्यात आलं होतं. पण शेवटी शरद पवार यांच्या बोटाला धरूनच राजकारणात स्थिरस्थावर झालेल्या त्यांच्या समर्थकांनी त्यांचा फोटो वापरणे काही बंद केले नाही. त्यानंतर शेवटी शरद पवार यांनीच आपला फोटो वापरू नये अन्यथा या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका घेतली.

 

 

आता दैवतच आपल्या विरोधात न्यायालयात जात असेल तर मग त्यांच्या अनुयायांनी काय करायचं? शेवटी त्यांनी एक युक्ती लढवली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो इथून पुढच्या काळात पोस्टर्सवर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी शरद पवारांचा फोटो पोस्टर्स वरून वगळण्यात आला. आता फोटो लावला तरी अडचण, फोटो काढला तरी अडचण.. अशी स्थिती माध्यमांमध्ये असल्याचं दिसून आलं.

 

 

नुकताच अजित पवार यांचा नाशिक जिल्हा दौरा झाला. या दौऱ्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना अजित पवार यांनी इथून पुढच्या काळात आपली राजकीय सामाजिक वाटचाल ही कुणाच्या पावलावर पाऊल ठेवून असेल.. हे स्पष्ट केलं. शरद पवार यांनी स्वतः कोर्टात जाणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावत असल्याच पवार यांनी स्पष्ट केलं. आता यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा महाराष्ट्रात आणि देशात एक सुसंस्कृत, सज्जन राजकारणी अशीच होती. त्यामुळ त्यांना किंवा त्यांचा विचार आदर्श ठेवून अजित पवार हे पुढची वाटचाल करत असतील तर त्यात गैर असं काहीच नाही. अर्थात शरद पवार यांचे राजकीय गुरू हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हेच आहेत असं मानलं जातं.

 

 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एकनाथ शिंदे गटाकडून पोस्टर्सवर लावण्यात आल्यानंतर असाच वाद निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे ‘बाप चोरणारी टोळी’ सक्रिय झाल्याची टीका केली होती. तेव्हापासून पोस्टर्स वर फोटो लावण्याचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने सुरु झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि परत फोटो हा विषय चर्चेला आला. पण अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी अत्यंत हुशारीने आणि खुबीने हा विषय संपवून टाकला आहे.

 

यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरला म्हणून आता कोण आक्षेप घेऊ शकत नाही. आणि अजित पवार यांच्या विचाराच्या समर्थकांनाही योग्य संदेश यातून मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा अजित पवार हे अनेकदा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजे कराडला प्रीतीसंगमावर गेलेले आहेत. मागं एकदा एक विधान त्यांनी केलं आणि महाराष्ट्रात त्यांच्या विधानाने गहजब माजला. त्यावेळी हे विधान आपण चुकून केलं आणि त्याचा पश्चाताप आहे म्हणून किंवा प्रायश्चित्त म्हणून एक दिवसाच उपोषण प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे बसूनच केलं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला मानण्यात आलेले आहेत.. हे महाराष्ट्रानं पाहिलेला आहे.

 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह आणि पक्षाच्या संदर्भातील सुनावणी की दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरू आहे. त्याच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाकडून संबंधित वकिलांनी केलेला युक्तिवाद हा मनाला वेदना देणारा ठरला अशी भूमिका व्यक्त केली. त्यावरही नाशिक जिल्हा दौऱ्यात पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला.. त्यावर अत्यंत मिश्किलपणे त्यांनी या विषयाला फारसं महत्त्व दिलं नाही.

हे ही वाचा:

इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा जुनाच!

हमासने गंभीर चूक केली आहे, हे त्यांच्या लक्षात येईल!

‘अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी’!

वादविवादानंतर कबड्डीत भारताने केली इराणची सोनेरी पकड

 

एखादा विषयासंदर्भात आपण न्यायालयात जातो तेव्हा आपली बाजू भक्कमपणे आपले वकीलच मांडत असतात, त्यासाठीच वकिलांची नियुक्ती केलेली असते.. वकिलांनी केलेला युक्तिवाद, सादर केलेली कागदपत्र हे पाहूनच न्यायालय आपली भूमिका किंवा मत हे तयार करत असतं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी फारसं महत्त्व दिलेलं नाही. एकूणच काय तर पोस्टर्स वर जेष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो वापरणं असो किंवा आता आयोगासमोर सुरू असलेली लढाई असो.. यामध्ये आता आपण माघार घेणार नाही.. घेतलेल्या भूमिकेवर ठामच राहू.. असाच संदेश अजित पवार यांनी शरद पवार गटासह महाराष्ट्राला दिला आहे.

Exit mobile version