राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना चर्चेत असतानाच स्वतः अजित पवार यांनी आपण एका अपघातातून बालंबाल बचावल्याचे सांगितल्याने सर्वांनाच धक्का बसला.
पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी १४ जानेवारीला आपण अपघातातून वाचलो हे सांगितले आणि उपस्थित स्तब्ध झाले.
अजित पवार म्हणाले की, मी हे कुणालाच सांगितले नव्हते पण आता आपलीच माणसे आहेत म्हणून सांगतो. मी एका हॉस्पिटलचे उद्घाटन केले नंतर दुसऱ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेलो होतो, तिथे तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायचे होते. मी डॉक्टरांना म्हटले की, मी जिन्याने जातो तर ते म्हणाले लिफ्टने जाऊ. मग आम्ही लिफ्टने निघालो तर लिफ्ट मध्येच बंद पडली. लिफ्टमधील लाईटही गेली. सगळीकडे अंधार पडला. तशीच ती लिफ्ट खाली जाऊ लागली आणि आदळली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली आली होती.
अजित पवार पुढे म्हणाले की, माझ्यासोबत असलेले हर्डीकर डॉक्टर हे ९० वर्षे वयाचे. पण सुदैवाने आम्ही बचावलो. नाहीतर आज माझ्या श्रद्धांजलीचाच कार्यक्रम करावा लागला असता.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोदींच्या प्रेमात; भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक
काँग्रेसच्या सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन, उमेदवारी अर्ज न भरल्याची शिक्षा
प्रत्येक भारतीयाला आपल्या लष्कराचा अभिमान
सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, कोणतीही इजा नाही
त्याआधी, सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली होती. एका उद्घाटनादरम्यान दिव्याची ज्योत साडीच्या संपर्कात आल्यामुळे साडीने पटकन पेट घेतला पण सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा सुदैवाने झाली नाही. मात्र एका पाठोपाठ एक अशा या घटना घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
अजित पवार यांनी सगळ्यांना काळजी घ्या असे आवाहनही यावेळी केले.