भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे १० आणि ११ सप्टेंबर या कालावधीत रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
अजित डोवाल हे या भेटीदरम्यान ब्रिक्स आणि एनएसए यांच्यातील बैठकीतही सहभागी होणार आहेत. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते रशिया तसेच चीनच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. जुलैमध्ये मॉस्कोत जी बैठक झाली होती, त्याचा मागोवा या बैठकीत घेतला जाईल.
ब्रिक्स हा भारत, ब्राझिल, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इराण, इथियोपिया या देशांचा समूह आहे. याआधीची ब्रिक्सची बैठक दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे गेल्या वर्षी झाली होती. त्यावेळी तिथे डोवाल उपस्थित होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बोलणे झाले असून डोवाल हे ब्रिक्सच्या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी ते म़ॉस्कोला भेट देतील आणि युक्रेनशी सुरू असलेले युद्ध थांबवून त्याठिकाणी शांतता कशी प्रस्थापित करता येईल, याविषयी भारताची भूमिका स्पष्ट करतील. डोवाल हे पुतिन याना नेमके केव्हा भेटतील हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर निवडणुका: भाजपकडून ६ वी यादी जाहीर !
चार अधीक्षक,२ लेखा परीक्षकांसह ८ जण सीबीआयच्या तावडीत
जरांगेना आता भुजबळांकडून येवल्याचे निमंत्रण
याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला ऐतिहासिक भेट दिली. तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांना सांगितले की, परस्पर संवाद आणि मुत्सद्देगिरी हेच केवळ शांतता प्रस्थापित करण्याचे पर्याय आहेत. रशियासोबत यासंदर्भात संवाद साधण्यासाठी आपण मध्यस्थाची भूमिका निभावू असे आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.
भारत हा केव्हाही या संदर्भात तटस्थ नव्हता तर आम्ही शांततेच्या बाजूचे आहोत, असे भारताने आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले होते. मोदी यांनी युक्रेनआधी रशियाचा दौरा केला होता आणि तिथे त्यांनी पुतिन यांच्याशी संवाद साधला होता. मोदींच्या या भेटीमुळे युरोपातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या पण मोदींनी युक्रेनलाही भेट दिली होती आणि त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले. भारत हा यासंदर्भात शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा रशियानेही व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष नरेंद्र मोदींकडे आहे.