इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे भारतीय संघात परतला आहे. ७ जूनपासून इंग्लंडमध्ये होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून त्यात रहाणेला संधी देण्यात आली आहे.
के.एल. राहुललाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरच्या दोन कसोटीत त्याला वगळण्यात आले होते.
जवळपास १५ महिन्यांनी अजिंक्य रहाणे भारतीय संघात परतला आहे. जानेवारी २०२२मध्ये तो दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत खेळला होता त्यानंतर मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पण आता चेन्नई सुपर किंग्जमधून खेळताना रहाणेने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याचा विचार भारतीय संघासाठी झाला. शिवाय, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांची अनुपस्थितीदेखील रहाणेच्या पुनरागमनासाठी कारणीभूत ठरली.
श्रेयस अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली असून काहीकाळ तो क्रिकेटपासून दूर आहे. पंत तर अद्याप अपघातातून झालेल्या दुखापतीमधून सावरलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कार अपघातात तो बचावला होता पण आता तो त्यातून हळूहळू सावरत आहे. रहाणेने यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाच डावात २०९ धावा केलेल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १९९.०५ आहे. शिवाय, रणजी स्पर्धेत गेल्या वर्षी त्याने ५७च्या सरासरीने ७ सामन्यांत ६३४ धावा केल्या आहेत.
के.एल. राहुलचा संघात समावेश असला तरी त्याला कदाचित सलामीवीर म्हणून संधी मिळणार नाही पण यष्टिरक्षक म्हणून त्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल. मधल्या फळीत त्याला फलंदाजी करावी लागणार आहे. इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती लक्षात घेता के.एल. राहुल आणि रहाणे यांच्यावर निवड समितीने भरोसा ठेवला आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल. पण हे तिघेही एकाचवेळी खेळतील अशी शक्यता नाही.
हे ही वाचा:
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी
डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?
ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’
भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले
वेगवान गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी सध्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह नाही. त्याच्या पाठीला दुखापत झालेली आहे. पण मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर ही जबाबदारी असेल.जयदेव उनाडकट आणि उमेश यादव यांच्यापैकी एकाला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकेल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस भारत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, उमेश यादव, जयदेव उनाडकट.