मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईमधील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी मोठे खुलासे करत जरांगेंवर टीकास्त्र डागले. मनोज जरांगे यांनी मराठा कुटुंबांना उध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका अजय महाराज बारसकर यांनी केली.
“गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण त्यांच्याकडे पाटील पदासाठी काही नाही. ते हेकेखोर आहेत कोणत्याही शब्दावर अडून राहायचे. समाज खूप भोळा आहे. यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी असून प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही,” अशी टीका बारसकर यांनी केली आहे.
“मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्यांच्या गुप्त बैठका रात्री होतात. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त बैठक केली. लोणावळा, वाशी येथेही समाजाला वगळून बैठक केली. वाशी पर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या बैठकांवर आक्षेप होता. मनोज जरांगे यांना काहीही कळत नाही पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय?” असा खोचक सवाल बारसकर यांनी उपस्थित केला आहे.
“वाशीच्या मार्केटमध्ये जरांगे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही, अशी घोषणा केली. तसेच आरक्षण मिळालं तरी आपण आझाद मैदानात जायचं असेही जरांगे पाटील म्हणाले होते. तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना १५ मिनिटांत अध्यादेश देतो, असे सांगितले खरंतर १५ मिनिटांत असा कुठलाही अध्यादेश निघत नाही. जरांगे पाटील यांना कायद्यातील काही कळत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा..
दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!
कुर्ल्यात साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर
अनुष्का, विराटच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
“मनोज जरांगे यांना फक्त श्रेय, जेसीबीतून फुलं आणि कार्यक्रम हवेत. आरक्षण गरिबाला हवंच आहे. पण यांना फक्त श्रेय हवं आहे,” असं म्हणत अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मनोज जरांगे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात, असाही आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या आक्षेपार्ह भाषेवरूनही अजय महाराज बारसकर यांनी त्यांना सुनावले. छत्रपती शिवरायांच्या समोर बसून जरांगे अतिशय वाईट भाषा वापरत असल्याचेही अजय महाराज बारसकर म्हणाले.