टाटा समूहाने जानेवारी २०२२मध्ये एअर इंडिया विकत घेतल्यानंतर आता नवीन लोगो आणि रंगसंगतीसह या विमान कंपनीला नवे रूप दिले आहे.
टाटा समूहाने अधिग्रहित केल्यानंतर ‘रिब्रँडिंग’चा एक भाग म्हणून एअर इंडियाने गुरुवारी एका सोहळ्यात नवीन लोगोचे अनावरण केले. एअर इंडियाच्या विमानांनाही नवीन रंगसंगती लाभणार आहे. दिल्लीत गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात नवीन लोगो आणि रंगसंगतीचे अनावरण करण्यात आले. नवीन लोगो हा एअरलाइनच्या प्रतिष्ठित महाराजा मॅस्कॉटचा आधुनिक अवतार आहे. अधिक शैलीदार डिझाइन आणि लाल, पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची नवीन रंगसंगती विमानांना लाभली आहे.
‘नवीन लोगो अमर्याद संधींचे द्योतक आहे,’ अशी प्रतिक्रिया एअरलाईनच्या नव्या लोगोचे अनावरण करताना टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी दिली. या नवीन रंगसंगतीत एअर इंडियाची ठळक लाल अक्षरे कायम ठेवण्यात आली आहेत, मात्र ती वेगळ्या ‘फॉन्ट’मध्ये आहेत. रंगसंगतीमध्ये विमानांच्या खालच्या बाजूस लाल रंगाचा पट्टाही आहे, ज्यामध्ये एअर इंडिया पांढऱ्या रंगात लिहिलेले आहे. नवीन बदलात एअर इंडियाद्वारे वापरल्या जाणार्या वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय खिडकीच्या आकाराचीही कल्पना करण्यात आली आहे. ज्यात सोनेरी खिडकीची चौकट आहे. हे ‘अमाप संधींच्या खिडकीचे’ प्रतीक आहे, असे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात
बीडमध्ये सिगारेटचे पाकीट महाग दिल्याने हॉटेलवर गोळीबार !
इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे
ज्ञानव्यापी मशीद परिसर सर्वेक्षणाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी
टाटा सन्सने जानेवारी २०२२मध्ये एअर इंडियाला त्याच्या पूर्ण मालकीची उपकंपनी, टेलेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकत घेतले. त्यानंतर, टाटा सन्सची आणखी एक उपकंपनी, एअर इंडिया आणि विस्तारा यांचे आणखी एकसंध अस्तित्व निर्माण करण्यासाठी विलीन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे विलीनीकरण मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.